पुणे : हिंजवडी, मारुंजी परिसरात राहणाऱ्या दीपक बुचडे याचे 18 जून रोजी लग्न पार पडणार होते. त्याची लग्नपत्रिका देवाच्या दारी ठेवण्यासाठी तो आपल्या दोन मित्रांसह घरून निघाला. तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट येथील मंदिरात लग्न पत्रिका ठेऊन ते घरी परत येणार होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुळजापुरच्या मंदिरात पत्रिका ठेवून झाल्यानंतर ते गाणगापूरला निघाले. तशी माहिती दीपक याने रात्री नऊ वाजता घरी फोन करून दिली. मात्र, रात्रीचा प्रवास करत असताना रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांच्या गाडीला अक्कलकोट गाणगापूर रस्त्यावर भीषण अपघात झाला.


अक्कलकोट गाणगापूर रस्त्यावर त्यांच्या कारला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडकी दिली. या भीषण अपघातात दीपक सुभाष बुचडे (वय 29 रा.मारुंजी) यांच्यासह त्याचे दोन मित्र आकाश ज्ञानेश्वर साखरे (वय 28, रा, हिंजवडी), आशुतोष संतोष माने (वय 23 रा.हिंजवडी) यांचा मृत्यू झाला.


नवरदेव दिपक बुचडे यांचे चुलत भाऊ चंद्रकांत राघुजी बुचडे (वय 41 रा. मारुंजी, ता. मुळशी) यांना या घेणेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी आणि मारूंजी परिसरातून तरूणांनी अक्कलकोटकडे धाव घेतली. उमद्या वयातील 3 तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.