पुणे पालिकेत खाबुगिरीचा प्रकार, नगरसेविकेच्या पतीची ठेकेदाराला धमकी
महापालिकेतील खाबुगिरीचा धक्कादायक नमुना पुण्यात समोर आलाय. टेंडरची रिंग तोडली म्हणून एका नगरसेविकेच्या पतीने ठेकेदाराला थेट धमकी दिली आहे. त्याची ऑडिओ क्लिप सध्या पुण्यात व्हायरल झालीय.
पुणे : महापालिकेतील खाबुगिरीचा धक्कादायक नमुना पुण्यात समोर आलाय. टेंडरची रिंग तोडली म्हणून एका नगरसेविकेच्या पतीने ठेकेदाराला थेट धमकी दिली आहे. त्याची ऑडिओ क्लिप सध्या पुण्यात व्हायरल झालीय.
२८ सेकंदांची क्लिप
एक मिस्टर कॉर्पोरेटर आणि एक कॉन्ट्रॅक्टर यांच्यातील संभाषण जोरदार व्हायरल होत आहे. अवघ्या २८ सेकंदांची क्लिप रिंगबाजांची पोलखोल करण्यासाठी पुरेशी आहे.
सरकारी तिजोरीवर डल्ला
रिंग बाजी हा महापालिकेच्या कारभाराला लागलेला भयंकर रोग आहे. कामाची कंत्राटं मिळवताना सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी ठेकेदार विशिष्ट हेतूने एकत्र येतात. त्यालाच रिंग असे म्हणतात.
पुण्याचा पूर्व भागातील एका कामाची निविदा प्रक्रिया राबवली जात असताना हा प्रकार घडलाय. रिंग तोडणाऱ्या ठेकेदाराला नगरसेविकेच्या पतीने सज्जड दमच भरला. मात्र महापालिकेत अनेक कामं अडकून असल्यानं तो ठेकेदार समोर येऊन बोलायला तयार नाही.
मलिदा चाखण्यासाठी अनेक सक्रिय
पुण्यामध्ये वर्षाकाठी हजारो कोटींची कामं केली जातात. त्यातून मिळणारा मलिदा चाखण्यासाठी सक्रिय असणाऱ्या सम्माननीयांची यादी खूप मोठी आहे.