पैशांचा पाऊस : नरबळीच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक
अकोल्यात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी नरबळीचा प्रयत्न झालाय.
अकोला : पैशांच्या पावसाच्या लोभापायी नरबळीच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक झालीय. विशेष म्हणजे यात सुधाकर राजाराम सोळंके या शिक्षकाचाही समावेश आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी हा सगळा प्रकार उघड केला. पैशांचा पाऊस पाडण्याच्या वादातून आप नेते मुकीम अहमद यांची हत्या. अनैतिक संबंध आणि संपत्तीच्या वादातून भारीप नेते आसिफ खान यांची हत्या. आता अकोल्यात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी नरबळीचा प्रयत्न झालाय.
अकोल्यात घडलेल्या या घटना समाजमन हादरवणाऱ्या. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सुधाकर राजाराम सोळंके हा शिक्षक आहे हे आणखी धक्कादायक. सोळंके हा अकोल्याच्या देशमुखफैल भागातल्या शिवाजी शाळेत शिक्षक आहे. त्याचे साथीदार शंकर मदनकार, अमोल चवहाण यांनाही अटक करण्यात आलीय. नरबळीसाठी ही टोळी २५ ते २० वयोगटातल्या अविवाहित तरूणाच्या शोधात होती. या टोळीने एका तांत्रिकाची मदतही घेऊ केली होती. या कटाची कुणकुण अंनिसला लागली आणि त्यांनी तक्रार दाखल केली.
ज्याने समाजाला दिशा द्यायची तोच पैशांच्या पाऊस पाडण्यासाठी नरबळीचे कट रचत असेल तर कठीण आहे. या नराधमांना कायद्याचा कठोर बडगा दाखवण्याची गरज आहे.