श्रीवर्धनमध्ये काँग्रेसच्या तीन बंडखोरांमुळे आदिती तटकरेंची डोकेदुखी वाढली
आदिती तटकरे आणि विनोद घोसाळकर यांच्यामध्ये लढत
प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : विधानसभा निवडणुकीत कोकणातील प्रमुख लढतींपैकी एक म्हणजे श्रीवर्धनची लढत. सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे आणि म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्यामध्ये हा सामना आहे. काँग्रेसच्या तीन बंडखोरांनी लढतीत रंगत आणली आहे.
रायगडमधल्या श्रीवर्धन मतदारसंघात सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे रिंगणात आहेत. सुनील तटकरेंच्या प्रचारानिमित्त, झेडपीच्या अध्यक्षा म्हणून त्यांचा या मतदारसंघाशी सातत्यानं सपर्क राहिलाय. त्यामुळे आदिती तटकरे हे नाव इथल्या घराघरांत पोहोचलं आहे.
आदिती तटकरेंचा सामना आहे तो म्हाडाचे सभापती शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांच्याशी. श्रीवर्धनमध्ये शिवसेनेचं पक्ष संघटन मजबूत आहे. परंतु लोकसभेत तटकरेंना मिळालेलं मताधिक्य मोडून काढण्याचं आव्हान घोसाळकरांसमोर आहे. घोसाळकर यांनी प्रचारात आदिती ऐवजी सुनील तटकरे यांनाच लक्ष्य केलं आहे.
श्रीवर्धनमध्ये काँग्रेसच्या तिघांनी केलेली बंडखोरी आदिती तटकरेंसाठी डोकेदुखी ठरू शकते. शिवाय इंडियन युनियन मुस्लीम लीगनेही आपला उमेदवार दिलाय. मुस्लीम मतांची संख्या लक्षणीय असलेल्या या मतदारसंघात यावेळी तीन मुस्लीम उमेदवार रिंगणात आहेत. त्याचा देखील फटका आदिती यांना बसू शकतो.
शिवसेनेनं दिलेला अनुभवी परंतु मतदारसंघासाठी नवीन असलेला उमेदवार आणि काँग्रेसमधील बंडखोरी यामुळे श्रीवर्धनची निवडणूक यावेळी चुरशीची ठरू शकते.