मुंबई पुणे महामार्गावर घडला थरार... चोरट्याचा पोलिसावरच प्रहार
वारंवार सूचना देऊनही ते चोर गाडीबाहेर येत नव्हते. उलट ते आक्रमक झाले.
कैलास पुरी, झी मिडिया, पिंपरी चिंचवड : पोलीस हवालदार प्रदीप गट्टे आणि त्याचे साथीदार काळे रात्री गस्त घालत होते. यादरम्यान चिखलीकडून तळेगाव येथे जात असताना त्यांना एका व्यक्तींने आपली कार चोरटयांनी चोरल्याची माहिती दिली. हे चोर मुंबईच्या दिशेने गेल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे त्या पोलिसांनी सोमाटने फाटा येथील पोलिसांना वायरलेसवर माहिती देऊन ती गाडी अडवण्यास सांगितले. तेथील पोलिसांनी सोमाटने फाटा येथील टोलनाक्यावर गाडी अडवली.
वारंवार सूचना देऊनही ते चोर गाडीबाहेर येत नव्हते. उलट ते आक्रमक झाले. त्यांनी गाडीबाहेर येत अडवणाऱ्या पोलिसावरच चाकूने हल्ला केला. परिस्थिती गंभीर बनली होती. अखेर घटनास्थळी उपस्थित तेथील एका अधिकाऱ्याने त्या चोरांवर बंदूक रोखली. त्यावर चोरट्याने गाडी आणि मोबाईल तिथेच ठेवून पळ काढला.
या प्रकरणी पोलिस कर्मचारी प्रदीप गुट्टे यांनी तळेगाव पोलिस स्थानकात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिस डोंगर भागात चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घटनास्थळाला भेट देत पोलिसांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.