Gadchiroli Naxal :  गडचिरोलीतील अहेरीतील रेपनपल्लीच्या जंगलात पोलिसांनी चार नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. सोमवारी रात्री पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात 4 नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा जवानांना यश आले आहे. या चारही नक्षल्यांवर 36 लाख रुपयांचं बक्षिस होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा घातपाताचा कट उधळला आहे. राज्याची सी-60 पथक आणि CRPFच्या एका तुकडीनं सर्च ऑपरेशन करत ही कारवाई केलीय. नक्षलवाद्यांकडं  AK 47 रायफल, एक कार्बाईन आणि दोन पिस्तूल असा शस्त्रसाठा आणि काही साहित्य आढळून आलंय. पोलिसांनी सर्व साहित्य हस्तगत केले आहे. 


लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाला मोठे यश मिळाले आहे. तेलंगणा राज्यातून घातपाताच्या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या चार नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. अहेरी तालुक्यातील रेपनपल्लीच्या जंगलातल्या कोलामार्का टेकडी परिसरात ही चकमक झाली. गडचिरोली जिल्ह्यात घातपात करण्याच्या उद्देशाने प्राणहिता नदी ओलांडून तेलंगणा राज्यातील काही बडे नक्षल नेते गडचिरोलीत आल्याची गुप्त सूचना पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अहेरी येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात विविध नक्षलविरोधी पथके या भागात शोधमोहीमेसाठी तैनात करण्यात आली.


नक्षलवाद्यांनी पोलिसांचा सामना होताच अंदाधुंद गोळीबार सुरू केला. काही वेळानंतर नक्षली पसार झाले. घटनास्थळाची पाहणी केल्यावर चार मृतदेह आढळून आले. मृत नक्षलवाद्यांपैकी दोन बडे डीव्हीसीएम दर्जाचे नक्षल नेते आहेत. घटनास्थळावरून 1 एके 47, कार्बाईन, देशी पिस्तुले व अन्य नक्षल साहित्याची जप्ती करण्यात आली आहे. एकूण 36 लाख रुपये रोकड देखील पोलिसांनी जप्त केली. या परिसरात मोठे शोध अभियान राबविले जात आहे. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये तेलंगणातील मंचेरियाल डिव्हिजनचा वर्गीस नावाचा डीव्हीसीएम, मागटू नावाचा सिरपूर- चेन्नुर एरिया कमिटीचा डीव्हीसीएम, प्लाटून कमांडर, प्लाटून मेंबर कुडिमेटा वेंकटेश याचा देखील समावेश आहे


जानेवारी महिन्यातच नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली होती. गडचिरोलीची सीमा आणि छत्तीसगड राज्याला लागून असलेल्या मौजा पेरिमिलीभट्टी जंगल परिसरात, 5 नक्षलवाद्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. गडचिरोली पोलीस दलातील सी 60 चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या दिशेनं गोळीबार केला. तेव्हा स्वसंरक्षणार्थ आणि प्रत्युत्तरादाखल जवानांनी गोळीबार केला. यावेळी नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. सी 60 कामांडोनी नक्षलवाद्यांचा शौर्यपूर्ण पाठलाग करुन 5 जहाल नक्षलवाद्यांना पकडलं होते.