तिवरे धरण दुर्घटना : ६ जणांचे मृतदेह हाती, १८ जण बेपत्ता
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने एकच हाहाकार माजला.
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने एकच हाहाकार माजला. चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले. बेपत्ता २४ लोकांपैकी ६ जणांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. त्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर १८ जण अजूनही बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, प्रशासनाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केल्यानेच धरण फुटल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
तिवरे धरण फुटण्यास प्रशासन जबाबदार, तक्रार करुनही दुर्लक्ष
या धरणाच्या पाण्यात बेंड वाडीतील १३ घरे पाण्याखाली गेली असून बेंड वाडितील १८ जण बेपत्ता आहेत. तर पाच जणांचे मृतदेह सापडलेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एनडीआरएफच्या दोन टीम तसंच पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थीळी दाखल झाले आहेत. पूराच्या लोंढ्यात गुरं ढोरंही पाण्यात वाहून गेलीत. धरण फुटल्यानं नजीकचा दादर पूल पाण्याखाली गेला असून ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तिवरे धरण फुटल्याने हाहाकार, १३ घरे पाण्याखाली तर २४ जण बेपत्ता
या धरणाला भगदाड पडले होते आणि त्याच भगदाडामुळे हे धरण फुटल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. धरणाला भगदाड पडल्याची तक्रार स्थानिकांनी प्रशासनाकडे केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. मात्र, याबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी वेळोवेळी राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती. मात्र, राज्य शासनाकडून धरण दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्य शासन या दुर्घटनेला जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. अधिकाऱ्यांनी भगदाड पडलेल्या ठिकाणी दोन ट्रक माती टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, निधी अभावी भगदाड बुजविण्याचे काम केले गेले नाही, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाचा दुर्लक्षपणा कारणीभूत असल्याचे अधिकारी वर्गात बोलले जात आहे. वेळेत निधी उपलब्ध करुन दिला असता तर ही दुर्घटना टाळता आली असती, अशी अधिकारी वर्गात कुजबुज आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाज यांनी झी २४ तासशी बोलताना दिली आहे. त्यामुळे चौकशी होऊन कोणावर कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.