परभणी : दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी परभणीच्या संवेदनशील नागरिकांनी झेंडूची फुलं ५० रुपये किलोने खरेदी करण्याचा निर्धार केला आहे. हिंगोलीतील कवी अण्णा जगताप यांनी सोशल मिडियावरुन लोकांना आवाहन केलं होतं. त्याचाच परिणाम म्हणून लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर हजारो नागरिकांनी ५० रुपये किलोनी झेंडूंचे फुले खरेदी केली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर दरवर्षी झेंडू ३० रुपयांच्या घरात असतो. मात्र यंदा मनमाड बाजार समितीमध्ये झेंडूला अवघा ५ रुपये किलो इतका कमी दर मिळतो आहे. उत्पादन खर्च तर सोडाच मजूरी, वाहतूक हमाली आणि तोलाईचाही खर्च निघत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी बाजारात आणलेला झेंडू रस्त्यावर फेकून दिला होता.


परतीच्या पावसामुळे झेंडूच्या फुलांना मातीमोल किंमत मिळते आहे. मागणी नसल्याने  फुलांना अक्षरशः ५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत असल्याने  शेतकऱ्यांनी वाहतूक खर्च निघत नसल्याने फुले मनमाड बाजार समितीच्या आवारात फेकून दिली होती.


  


दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यात यंदा संततधार पाऊस सुरुच असून, पावसामुळे फटाके विक्रेत्यांच्या फटाके विक्रीवर लगाम लागला आहे. यंदा सत्तर टक्के फटाके विक्री कमी झाली. यामुळे आपोआपच प्रदूषण कमी होणार आहे. शहराच्या जी. एस. ग्राउंडवर दरवर्षी पन्नास पेक्षा जास्त फटाके विक्रेते स्टॉल लावतात. पावसामुळे मात्र फटाके विक्रीकर मोठा परिणाम झाला आहे.