शेतकऱ्यांचा संप पाचव्या दिवशीही सुरुच, महाराष्ट्र बंदला प्रतिसाद
शेतकऱ्यांचा संप पाचव्या दिवशीही सुरुच आहे. आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये अनेक गावांनी सहभाग घेण्याचा निर्णय घेतलाय. काल नगर जिल्ह्यात संपाला पाठिंबा कायम ठेवत शेकडो लीटर दूध रस्त्यावर ओतलं. भाजीपालही फेकण्यात आला.
पुणतांबा : शेतकऱ्यांचा संप पाचव्या दिवशीही सुरुच आहे. आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये अनेक गावांनी सहभाग घेण्याचा निर्णय घेतलाय. काल नगर जिल्ह्यात संपाला पाठिंबा कायम ठेवत शेकडो लीटर दूध रस्त्यावर ओतलं. भाजीपालही फेकण्यात आला.
सरकारचा निषेध म्हणून संपाची ठिणगी पडलेल्या पुणतांब्यात शेतक-यांनी मुंडण केलंय. नगर मनमाड रोडवरच्या चिंचोली फाटा इथे हे मुंडण आंदोलन करत सरकारचं दहावं घालण्यात आलं. रवंदे, वाकडीमध्ये सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. गावात कडकडीत बंदही पाळण्यात येतोय. कोळपेवाडीतला आठवडी बाजारही बंद ठेवण्यात आलाय. आंबी खालसा मध्येही सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आलीय.
आज महाराष्ट्र बंद
शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलीय. तसेच महाराष्ट्रात आज एकही वाहन फिरू देऊ नका असं आवाहन बुधाजीराव मुळिक यांनी केलंय. शेतकरी संघटनेच्या बैठकीत हा ठराव करण्यात आलाय. तर सहा जूनला मुंबईत कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्यानंतर 8 जूनला राज्यस्तरीय कृषी परिषद घेऊन या परिषदेला सर्व राज्यस्तरीय नेते हजर राहणार आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होणार असल्याचंही जाहीर केलंय. ते कोल्हापुरात बोलत होते. अन्नदात्यासाठी सगळ्यांनी एकत्र येवून बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन राजू शेट्टींनी केलंय.
सदाभाऊ खोतांना जाब विचारणार
संप मोडून सदाभाऊ खोतांनी चळवळीचा घात केला असून कार्यकारिणीत त्यांना जाब विचारू असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टींनी केलाय. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. तर मध्यस्थी करून प्रश्न सोडवणं चूक आहे का? सदाभाऊ खोतांनी असा टोला राजू शेट्टींना लगावलाय.राजकारणाच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी कुणी बोलत असेल तर त्याकडे आपण लक्ष देत नसल्याचंही सदाभाऊ म्हणाले. ते मिरजमध्ये बोलत होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांवर टीका केलीय. स्वामिनाथन कोण होता हे समजण्यासाठी चंद्रकांत पाटलांची परीक्षा घ्यायला हवी अशी बोचरी टीका त्यांनी केली.