दिवसा उन्हाळा, रात्री हिवाळा; राज्यात हवामानाची विचित्र स्थिती, पाहा तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातून अवकाळीनं काही अंशी माघार घेतलेली असतानाच अखेर राज्यात हिवाळा पकड मजबूत करताना दिसत आहे.
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या अवकाळीनं शेतकऱ्यांना हवालदिल करून सोडलेलं असतानाच आता हाच अवकाळी पाऊस राज्यातून पाय काढताना दिसत आहे. तिथं पश्चिमी झंझावातामुळं हवामानात होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम आता राज्यातील हवामानावरही होताना दिसत आहे.
थोडक्यात आता राज्यात थंडीचा कडाका वाढत असून, मुंबई आणि उपनगरांमध्येही किमान तापमानाच घट झाली आहे. असं असलं तरीही सकाळच्या वेळी कमाल तापमानात मात्र फारसा फरक पडेलला नाही. त्यामुळं सकाळी आणि दुपारी उकाडा, तर रात्रीच्या वेळी आणि पहाटे गारवा असंच वातावरण सध्या शहरात, पाहायला मिळत आहे.
विदर्भात गारठा वाढला
राज्यातील ढगाळ वातावरण सध्या निवळत असून, परिणामस्वरुप किमान तापमानाच घट नोंदवली जात आहे. ज्यामुळं डोंगरमाथ्यावरील भागांमध्ये धुकं आणि दवाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही थंडीनं आता जोर धरसा असून, येत्या आठवड्यामध्ये थंडी आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात उच्चांकी तापमानाची नोंद रत्नागिरी येथे करण्यात आली असून, तिथं तापमान 35.6 अंश इतकं होतं तर, निच्चांकी तापमानाची नोंद गोंदिया येथे करण्यात आली असून, तिथं तापमान 13 अंशांवर होतं.
हेसुद्धा वाचा : अजित पवार यांचे नाव घेत संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट
कमाल तापमानात काहीशी वाढ नाकारता येत नाही
उत्तर भारतामध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली असून, काश्मीरच्या खोऱ्यात आणि हिमाचल प्रदेशातील पर्वतीय भागांमध्ये प्रचंड बर्फवृष्टी पाहायला मिळत आहे. त्यातच उत्तराखंडमध्येसुद्धा चित्र वेगळं नाही. उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडलेली असतानाच या शीतलहरी मध्य भारतापर्यंत येत आहेत. पण, त्यापुढे मात्र या शीतलहरींचा वेग मंदावत असून, कमाल तापमानाच फारशी घट होत नाहीये. इतकंच नव्हे, तर दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळंही दिवसाचं तापमान फारसं कमी होत नाही.
दरम्यान, सध्या देशाच्या उत्तरेकडील राज्यांसह महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढेल. दक्षिण आणि उत्तर पूर्वेला असणाऱ्या राज्यांमध्ये मात्र काही भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. थोडक्यात देशाच्या प्रत्येक भागात हवामानाचं वेगळंच रुप पाहायला मिळणार आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.