जागते रहो! टोमॅटो चोरीची भीती, शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल
टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांना टोमॅटोने मोठा फायदा मिळवून दिला. पण टोमॅटोचे दर भडकल्याने चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर शेतात खडा पहारा द्यावा लागत आहे. नाशिक मधल्या एका शेतकऱ्याने टोमॅटो पिकाची राखणदारी करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे.
सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : देशभरात टोमॅटोच्या (Tomato) किमती सध्या गगनाला भिडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी 60 रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो 200 रुपये किलोच्या पुढे गेला असून टोमॅटोचे भाव भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाढलेले दर पाहाता टोमटोला आता सोन्याचा भाव (Gold Price) आलाय. त्यामुळे टोमॅटो चोरीच्या घटनाही वाढल्यात. शेतकऱ्यांना दिवसाच नाही तर रात्रभर खडा पहारा द्यावा लागत आहे. वाढत्या किंमतींमुळे शेतामधून टोमॅटो चोरी जाण्याची भीती वाढली आहे. यावर नाशिकच्या एका शेतकऱ्याने अनोखी शक्कल लढवली आहे.
टोमॅटोच्या शेतीवर पाळत
नाशिक (Nashik) जिल्ह्यात महत्वाची पिकं म्हणजे कांदे, द्राक्ष आणि टोमॅटो. यापूर्वी द्राक्ष आणि कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्याच्या शेतातून चोरांनी कांदे चोरून नेल्याची घटना घडली होती. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल होत. कांद्या नंतर सध्या शेतकऱ्यांच्या टोमॅटोला चांगला भाव मिळतोय. भाव चांगला मिळत असल्याने टोमॅटो चोरीला जाऊ नये म्हणून एका शेतकऱ्याने शेतातील पिकांवर पाळत ठेवायला सुरुवात केली आहे.
गेल्या महिनाभरापासून भाजी पाल्यांचे दर वाढले आहेत. यात मिरची, फळ भाज्या, पाळ्या भाज्या यांची दरात मोठ्या प्रमाणात झाली आहे. टोमॅटोला तर सोन्याचा भाव आलाय. काही राज्यात टोमॅटोची आवक घटली आहे. नाशिकच्या टोमॅटोला चांगली मागणी वाढली आहे. कृषी उत्पन बाजार समितीत टमाट्याची आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे. सध्या टोमॅटो पिकाला प्रति क्रेट कमीत कमी 2300 तर जास्तीत जास्त 5 हजार रुपये दर मिळत आहे. यामुळे किरकोळ बाजारातही शेतकऱ्याच्या हाती चांगली कमाई पडत आहे. यामुळे शेतकरी आनंदी आहे.
आयडीयाची कल्पना
कधी अवकाळी पाऊस, कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ. यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडे मोडलं आहे. शेतातील पिकासाठी केलेला खर्चही कधी निघून येत नाही अशी शेतकऱ्यांची परिस्थती आहे. यावर मात करत नाशिक जिल्ह्यातील कोकणगाव इथला शेतकरी अब्दुलगणी सय्यद यांनी आपल्या तीन एकर शेतात टोमॅटोचे पिक घेतलं आहे. टोमॅटोला कृषी उत्पन्न बाजारात चांगली किंमत मिळतेय. यामुळे त्यांना भीती आहे शेतातील टोमॅटो चोरी जाण्याची किंवा नुकसान होण्याची. यावर अब्दुलगणी सय्यद यांनी आपल्या तीन एकर टोमॅटो पिक असलेल्या शेतात चक्क सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे लावले आहेत. यामुळे त्यांना शेतात लक्ष ठेवणे सोपं झालं आहे.
अज्ञात व्यक्तींकडून शेतातील टोमॅटोचे नुकसान आणि चोरी झाल्याच्या घटना झाल्या आहेत. अशा घटना होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन त्यांनी इतर शेतकऱ्यांना केलं आहे.