मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक बंद, बावनदी पुलावर पुराचे पाणी
रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही संततधार सुरुच आहे. वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात सर्वच नद्या दुथडी भरुन वाहत आहेत.
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही संततधार सुरुच आहे. वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात सर्वच नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटाच्या पायथ्याला असलेला बावनदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. बावनदीला पूर आल्याने पोलिसांनी ब्रिटिशकालीन पुलावरील वाहतूक रोखली आहे. बावनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुलावर पाणी येण्यास सुरुवात झाल्याने हा पूल धोकादायक झाला आहे. रत्नागिरी आणि संगमेश्वर आणि देवरुखच्या दिशेने वाहनांच्या लागल्या रांगा आहे. तर गणपतीसाठी येणाऱ्या चाकरमान्यांची कोंडी झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता नद्यांच्या पाणी पातळीतदेखील मोढी वाढ झाली आहे. दरम्यान, राजापुरातील कोदवली, लांजा तालुक्यातील काजळी , संगमेश्वर तालुक्यातील बावनदी, खेडमधील जगबुडी , चिपळूणमधील वाशिष्ठी, शिव या नद्या आता धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. काजळी नदीला पूर आल्याने रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई पुलावरुन आता पाणी वाहू लागले आहे. शिवाय, बाजारपेठेत देखील पाणी शिकल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. कालपासून पावसाचा जोर वाढल्यानं आता नदीचं पाणी थेट बाजारपेठेत शिरले आहे.
रायगड जिल्ह्यातील काही भागात पावसाची संततधार सुरुच तर काही भागात जोर ओसरला तरी पाऊस आहे. सलग दुसऱ्या दिवशीही महाड शहरात पुराचे पाणी घुसले आहे. बाजारपेठेत पाणी कायम असून माणगाव, मुरुड, श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यात संततधार सुरुच आहे. रायगड जिल्ह्यातील नदी किनारी भागात सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.