Somnath Shinde : रविवारी लोणावळ्यातील मुळशी तालुक्यातील तैलबैला (tailbaila) सुळक्यावरुन क्लाइम्ब करताना एका ट्रेकरचा पडून मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आणि महाराष्ट्रातील गिर्यारोहण प्रेमींमध्ये शोककळा पसरली. मूळचा उस्मानाबादचा असणाऱ्या सोमनाथ बळीराम शिंदे (25) याचा ट्रेकिंगदरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय. सोमनाथचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच शिवप्रेमींसह गिर्यारोहकांनी 'सह्याद्रीपुत्र' म्हणत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. सोमनाथ शिंदे याचा तैलबैला कड्यावरून पडून मृत्यू झाला. सोमनाथ हा एक कुशल ट्रेकर होता. त्याच्यासोबत गिर्यारोहणसाठी आलेल्या इतर ट्रेकर्सना वर चढण्यासाठी दोरी बांधत होता. त्यावेळी त्याचा तोल गेला आणि तो 200 फूट खोल दरीत कोसळला. (Trekker Somnath Shinde falls down and dies while trekking at tailbaila in Lonavala)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमनाथ हा इतर मित्रांसह ट्रेकिंगसाठी लोणावळ्यात आला होता. त्याच्यासह आणखी सहा ट्रेकर त्याच्यासोबत होते. पहाटे सुळक्यावर क्लाइम्ब करताना सोमनाथ पाय घसरून खोल दरीत पडला. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. शिवदुर्ग रेस्क्यू टीमने त्याचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर त्याचा मृतदेह जवळच्या गावात आणला. सोमनाथ हा मूळचा  उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील असून तो काही काळापासून पुण्यातील कात्रज परिसरात राहत होता.


स्थानिक पौड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील गरुडझेप ट्रेकिंग ग्रुपमधील सहा ट्रेकर्सच्या ग्रुपसह सोमनाथ शनिवारी संध्याकाळीच तैल बैलाला आला होता आणि रात्री जवळच्या गावात थांबला होता. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्याच्या ग्रुपने चढाईला सुरुवात केली. "सकाळी 9.30 च्या सुमारास सोमनाथ इतरांना चढण्यासाठी ट्रेकिंगची दोरी लावत असताना दोर तुटला आणि तो 200 फूट खाली दरीत कोसळला," अशी माहिती पोलिसांनी दिली.


"आमच्या माहितीनुसार, सोमनाथ हा एक कुशल गिर्यारोहक होता आणि त्याने सह्याद्री आणि इतर पर्वतरांगांमध्ये अनेक ट्रेक केले होते. अपघाताला कारणीभूत असलेल्या घटनेचा आम्ही तपास सुरू केला आहे. त्याच्या गटातील सदस्यांचे जबाब नोंदवले जातील," असे पौड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.