अरूण मेहेत्रे झी मीडिया, पुणे : पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ झाला. विशेष म्हणजे, त्यासाठी कारणीभूत ठरले ते पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएमपीएल संदर्भातील विषयावर चर्चा करण्यासाठी ही खास सभा बोलावण्यात आली होती. मात्र, ही सभा सुरु असतानाच मुंढे सभागृहातून निघून गेल्यानं सभासदांनी संताप व्यक्त केला गेला... इतकंच नाही तर मुंढेंवर कारवाईची मागणीही महापालिकेतील विरोधकांनी केली.


मुंढेंनीच दिली संधी?


महापालिका सभासदांच्या मनातील तुकाराम मुंढेंविरोधातील खदखद पुन्हा एकदा बाहेर पडली. खरं तर मुंढेंनीच त्यांना संधी उपलब्ध करून दिल्याचं म्हणावं लागेल. पीएमपीएल संदर्भात उपस्थित होत असलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष सभा बोलावण्यात आली होती. पीएमपीएल पासेसचे दर, अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांवर होत असलेली कारवाई, बसेसची संख्या, ठेकेदारांवरील कारवाई अशा विविध मुद्दयांवर चर्चा हा या सभेचा मुख्य विषय होता.


त्यानुसार पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे ठिक ११ वाजता महापालिकेत हजर झाले. त्यानंतर त्यांनी सभासदांसमोर तब्बल ४० मिनटांचं भाषण केलं. पीएमपीएलच्या कारभारात केलेल्या सुधारणा आणि त्यांना मिळत असलेल्या यशाचा पाढाच त्यांनी आपल्या निवेदनात वाचला. त्यानंतर पाळी आली महापालिकेतील सभासदांची...


सभासदांच्या मनातली खदखद


त्यांनी एक एक करून मुंढेच्या कारभाराची चिरफाड करायला सुरवात केली. मुंढे हे हुकूमशाही पद्धतीनं कारभार हाकत असल्याचा त्यांच्या टिकेचा प्रमुख सूर होता. ही भाषणं रंगात आली असतानाच विपरित घडलं. महापालिका आयुक्तांच्या शेजारी बसलेले तुकाराम मुंढे अचानकपणे सभागृहातून निघून गेले आणि गहजब उडाला... सभागृहातील सभासद संतप्त झाले. मुंढेंच्या या वागण्यावर विरोधकांसह सत्ताधारी भाजपच्या सभासदांनीही जोरदार टीका केली. 


भाजपची अडचण


मुंढेंच्या निघून जाण्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही चांगलीच जुंपली. मुंढेंवर कंपनी कायद्यानुसार करावाई करण्याची मागणी राष्ट्रवादीनं केली, तर सत्ताधारी भाजपचा प्रशासनावर वचक नसल्याची टीका काँग्रेसनं केली. त्यामध्ये मुंढेंच्या विषयावरून भाजपची चांगलीच अडचण झाल्याचं निदर्शनास आलं.


मुंढेंचं वागणं नियमबाह्य?


खरं तर महापालिकेच्या सभेला मुंढे येणार का याविषयीची चर्चा आधीपासूनच सुरु होती. मात्र ते केवळ आले नाहीत तर सार्यांना चकीत करून निघूनही गेले. अर्थात मुंढेचा स्वभाव आणि कार्यपद्धती पाहता यात आश्चर्य वाटावं असं काहीच नाही. राहीला प्रश्न त्यांनी नियमबाह्य असं काही केलंय का त्याचा...तर मुंढे एक अधिकारी म्हणून कसे आहेत ते सगळ्यांनाच माहीती आहे. त्यामुळे या प्रकरणांचं पुढे काय होणार हे सभासदांसह साऱ्यांनीच समजून घेण्याची आवश्यकता आहे.