भारतात तुर्कस्थानचा कांदा दाखल, किलोत बसतात फक्त २ नग
तुर्कस्तानचा हा कांदा दर्जेदार असल्याने व्यापाऱ्यांची आणि ग्राहकांची पंसती
नाशिक : कांदा दरवाढीने उच्चाक गाठला असतानाच आता लाल कांद्याचे आगार असलेल्या नाशिकच्या नांदगावमध्ये थेट तुर्कस्थानचा कांदा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे आकाराने मोठे असलेला कांद्याचे किलोमध्ये दोनच नग बसतात. बाजारात विक्रीसाठी आलेला कांदा आकाराने लहान व खराब झाल्याने मेट्रो सिटी व हॉटेल तसेच पंचतारांकीत हॉटेलमध्ये लाल कांदा पसंतीस उतरत नसल्याने नांदगावच्या संदीप हस्तीमल या कांदा व्यापाऱ्याने पंजाबच्या व्यापार्यांकडून थेट 'तुर्कस्थान'चा कांदा आयात केला आहे.
अफगाणिस्थान - पाकिस्तान - पंजाबमार्गे तब्बल पाच हजार किलोमीटर प्रवास करून तुर्कस्थानचा पिवळा कांदा नाशिकच्या नांदगावमध्ये दाखल झाला. साधारणतः ७० रुपये प्रतिकिलोने हा कांदा खरेदी करण्यात आला आहे. मागणीनुसार हा कांदा बंगळुरुकडे रवाना करण्यात आला असून सरासरी प्रतिकिलो ८५ ते ९० रुपये भाव मिळण्याची कांदा व्यापाऱ्याला अपेक्षा आहे.
देशात आणि राज्यात कांद्याचे दर प्रचंड वाढले आहेत. सामान्यांच्या ताटातून तर तो सध्या हद्दपार झाला आहे. भारतात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने भाव वाढत आहे. नवा कांदा येण्यासाठी वेळ लागणार असल्याने कांद्याने सध्या वांदा केला आहे. त्यामुळेच भारतातील व्यापारी आता परदेशातून कांदा आयात करत आहेत.
याआधी पुण्यात देखील तुर्कस्थानचा कांदा दाखल झाला होता. तुर्कस्थानचा कांदा हा महाराष्ट्रातील कांद्यापेक्षा मोठा आहे. त्यामुळे त्यांचं वजन ही जास्त आहे. या कांद्याचा दर्जा चांगला असल्यामुळे या कांद्याला भाव मिळत आहे. पुण्यात हा कांदा ८० रुपये प्रतिकिलोच्या दराने विकला गेला होता.