दुर्देवी! ऐन होळीच्या दिवशी दोन शेतकऱ्यांच्या पेटल्या चिता
एकीकडे होळीचा आनंद साजरा होतोय, तर दुसरीकडे दोन कुटुंबातील कर्त्या पुरुषांनी जीवन संपवलं
गणेश मोहाले, झी मीडिया, वाशिम : गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे राज्यात होळीचा सण साजरा झाला नाही. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून यंदा होळीबाबत लोकांमध्ये खूप आनंद आणि उत्साह आहे. सगळीकडे होळीची तयारी होताना दिसत आहे.
पण वाशीम जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने ऐन होळीच्या दिवशी त्यांची चिता पेटविण्याची वेळ कुटुंबावर आली आहे वाशिमच्या रिसोड तालुक्यातील लोणी खुर्द इथला शेतकरी अनिरुद्ध भिकाजी गाडे हे चार एकर शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे.
भिकाजी गाडे यांची चार एकर शेती आहे, पण बँकेचं मोठं कर्ज असल्याने गेल्या काही महिन्यांपासून ते तणावात होते. याच तणावातून आज सकाळी त्यांनी घराशेजारी असलेल्या विहिरीत गळफास घेत आत्महत्य केली.
दुसऱ्या घटनेत वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम करंजी इथल्या युवा शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलं. मदन सुभाष विढोळे असं शेतकऱ्याचं नाव असून तो 28 वर्षांचा होता. सुभाष हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा.
शेती करुन तो आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत होता. त्याच्या नावावरही बँकेचं कर्ज होतं. कर्ज कसं फेडायचं या चिंतेतून मदनने आपल्या आयुष्य संपवल्याचं बोललं जात आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याप्रकरणी शिरपूर पोलीस अधिक तपास करत आहेत आहे.
ऐन होळीच्या दिवशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने करंज आणि लोणी खुर्द गावावर शोककळा पसरली आहे.