चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, पुणे : पावसाळ्याचा (Rainfall) आनंद घेण्यासाठी लोणावळ्यात (Lonavala) जाणं दोन मुंबईकर तरुणांच्या जीवावर बेतलं आहे. लोणावळा लगतच्या वरसोली गावात वर्षा विहारासाठी आलेल्या मुंबईतील दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. प्रियांक व्होरा आणि विजय यादव अशी त्यांची नावे आहेत.  प्रियांक आणि विजय हे त्यांच्या मित्रांसह लोणावळा परिसरात शनिवारी वर्षाविहारासाठी आले होते. मात्र दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रियांक पानचंद व्होरा हा पवईत तर विजय सुभाष यादव हा घाटकोपर येथे राहायला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलग सुट्ट्या आल्याने शनिवारी प्रियांक, विजय आणि त्यांचे मित्र लोणावळा परिसरात वर्षाविहारासाठी आले होते.  लोणावळा शहराजवळ असलेल्या वरसोली गावातील खाणीत पाणी असल्याने ते तिथे थांबले होते. शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास प्रियांक आणि विजय यादव आणि जेनिया वियाग हे तिघे खाणीत उतरले होते. पाण्यात उतरल्यानंतर काही वेळातच पाय घसरल्याने  तिघेही खाणीत बुडू लागले. हा सगळा प्रकार पाहून बाहेर असलेल्या मित्रांना आरडाओरडा सुरु केला आणि मदत मागण्यास सुरुवात केली.


आरडाओरडा ऐकून ग्रामस्थांनी खाणीच्या ठिकाणी धाव घेतली आणि तिघांना पाण्याच्या बाहेर काढलं. मात्र त्यातील प्रियांक आणि  विजयचा मृत्यू झाला होता. नाका-तोंडात पाणी शिरल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत उघडकीस आले. विजय आणि प्रियांकच्या मृत्यूची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. मृत्यूची बातमी ऐकताच कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. शवविच्छेदनानंतर दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. तर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जेनिया वियागला वाचवण्यात यश आले आहे. या प्रकरणी लोणावळा पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


दरम्यान, माळशेज घाटातील प्रसिद्ध अशा धबधब्यावर सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांमध्येही मोठी वाढ झाली आहे. मात्र तिथे येणाऱ्या हुल्लडबाजांमुळे ग्रामीण पोलिसांनी या भागात गस्त वाढवली आहे. कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाट पावसाळ्यात पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. उंचावरून खाली कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. मात्र, काही पर्यटक फक्त हुल्लडबाजी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे पोलिसांना अशा पर्यटकांना रोखण्यासाठी कसरत करावी लागत आहे.