चांदोरा वनविभागाच्या हद्दीत हरणांची शिकार करणाऱ्या दोघांना अटक
चांदोरा येथे हरणांची शिकार करताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
नाशिक : चांदोरा येथे हरणांची शिकार करताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे. पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास दोघे जण शिकार करण्यात मग्न होते. यावेळी सर्तक नागरिकांनी पोलीस आणि वनअधिकाऱ्यांना याची माहिती दिली. ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून शिकारीचे साहित्य आणि दुचाकी, मोबाईलही जप्त करण्यात आले आहे.
पूर्व नाशिकमधील नांदगावच्या चांदोरा वनविभागाच्या हद्दीत हरणांची शिकार करतांना दोघांना ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे रंगेहाथ ताब्यात घेण्यात वनविभाग आणि पोलिसांना यश आले आहे. अश्पाक अहमद महम्मद अन्वर, मुदरसीर अहमद अकील अहमद असे अटक करण्यात आलेल्या शिकाऱ्यांची नावे आहे. हे दोघेही मालेगावचे रहिवासी आहे.
नांदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हरण आणि कळविटांची संख्या आहे. चांदोरा शिवारातही हरणांचे अनेक कळप आहेत. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास हत्यारांसह काही लोक प्राण्याची शिकार करीत असल्याची माहिती ग्रामस्थांनी नाशिक नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाने तात्काळ गस्तीवर असलेल्या नांदगाव पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली.
नांदगाव पोलीस आणि वन विभागानेसंयुक्त कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक जण हरणांवर सर्च लाईट चमकावत होता. तर एक जण बंदुकीने गोळीबार करतांना आढळून आले. त्यांच्याकडून दुचाकी, छऱ्यांची बंदूक, ५ काडतुसे लोखंडी सुरे, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात वन्यप्राणी संरक्षण कायदा आणि आर्म आर्मअॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती नांदगाव वनपरीक्षेत्राचे अधिकारी डी. बी. बोरसे यांनी दिली.