दोन वर्षाचा मुलगा उकळत्या चहाच्या भांड्यात पडला आणि... जळगावमधील धक्कादायक घटना
आई चहा बनवत होती. दोन वर्षाचा पवन आईजवळ आला आणि बघता बघता तो उकळत्या चहाच्या भांड्यात पडला. यात त्याचा चेहरा गंभीररीत्या भाजला आहे.
Jalgaon News : पालकांनी लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज आहे. उकळत्या चहाच्या भांड्यात पडल्याने दोन वर्षीय चिमुकल्याचा चेहरा भाजला आहे. जळगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. तात्काळ या मुलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालायत सुविधांचा अभाव असल्याने उपचारात अडचणी आल्याचा दावा या मुलाच्या कुटुंबियांनी केला आहे.
जुने जळगाव येथे ही धक्कादायक घडली आहे. जखमी मुलगा हा विठ्ठल मंदीर परिसरात राहणारा आहे. दोन वर्षाचा चिमुकला हा गरम चहाच्या पातेल्यात पडल्याने संपूर्ण चेहरा भाजला आहे. जखमी झालेल्या चमुकल्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मात्र, एकदा उपचार केल्यानंतर बराच वेळ होऊन देखील डॉक्टर किंवा नर्स जळीत कक्षात उपस्थित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन हे मेडिकल हब बनवीत आहेत. तर, दुसरीकडे रुग्णांना डॉक्टर मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
पवन बारेला असे जखमी मुलाचे नाव आहे. पवनचे वडिल दिनेश रमश बारेला जुने जळगावातील विठ्ठल मंदीर परिसरात पती व तीन मुलांसह वास्तव्याला आहेत. सेंट्रींगचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. दिनेश बारेला यांची पत्नीने चहा केली होती. चहा उकळत असताना पवन हा अचानक जवळ आला. त्याचा धक्का लागल्याने तो चहाच्या पातेल्यावर पडला. उकळत्या चहामुळे त्याचा चेहरा पुर्णपणे भाजला गेला. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असून त्याचा प्रकृती स्थिर आहे.
रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याचा आरोप
जळगाव जिल्ह्यात देशातील सर्वाधिक तापमान आहे. उष्माघाताने अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची आरोग्यदूत म्हणून ओळख आहे. मात्र, रुग्णालयातील जळीत कक्षाची अवस्था ती अत्यंत बिकट आहे. यात एसी बंद आहेत तर गेल्या अनेक तासनापासून कक्षात डॉक्टर किंवा नर्स उपस्थित नसल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या अनेक वेळेपासून वैद्यकीय स्टाफ उपस्थित नसल्याने भर उन्हाळ्यात रुग्णांची गैरसोय होत आहे. कुठेतरी रुग्णांची थट्टा सुरू आहे की काय अस प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याचा आरोप पवन याच्या कुटुंबियांनी केला आहे.