अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : मित्रांसमवेत नदीवरील बंधाऱ्यावर पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यातील गाळात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाठोडा बुजरुक या गावात घडली. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. ज्यामध्ये योगेश सतीश सलामे (वय १५)आणि यश गजानन मेश्राम (वय १४) या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, शोध पथकाला योगेश सलामे याचा मृतदेह शोधण्यात सोमवारीच यश आलं. ज्यानंत यश मेश्राम याचा मृतदेह शोधण्यात आला.


सोमवारी दुपारच्या सुमारास झालेल्या पावसामुळे परिसरातील नदी-नाले तुडूंब भरून वाहत होते. इतक्यात सायंकाळी वाठोडा (बु) गावातील योगेश सतीश सलामे (वय १५) आणि यश गजानन मेश्राम (वय १४) हे दोघे मित्रांसह गावालगत असलेल्या एका नाल्यावरील बंधाऱ्यावर पोहायला गेले.


पोहत असताना हे दोघं अचानक बंधाऱ्यातील गाळात फसले. ही बाब सोबत असलेल्या मित्रांना लक्षात येताच त्यांनी आरडा-ओरडा करत गाव गाठलं. घडला प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तर बाबा ठाकुर यांनी पोलीस आणि प्रशासनाला याबाबतची माहिती दिली.


 


महसूल विभागाचे मंडळ अधिकारी नरेश सावंत व तलाठी विजय गाते यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली. मंगरूळ पोलीस स्थानकाचे ठाणेदार श्याम वानखडे यांच्या उपस्थितीत उशिरा रात्रीपर्यंत शोध मोहीम सुरू होती. योगेशचा मृतदेह पंचनामा करून उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेबाबत संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.