सोलापूर: आज राजेशाही असती तर मी दुष्काळ निवारणाचे सर्व निर्णय घेऊन कधीच मोकळा झालो असतो, असे वक्तव्य साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. ते गुरुवारी पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या मोकळ्याढाकळ्या शैलीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, आज जर राजेशाही असती तर दुष्काळ निवारणाचे निर्णय घेऊन रिकामा झालो असतो. सध्याचे सत्ताधारी दुष्काळाबाबतचे प्रश्न सोडवण्यात कमी पडत असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी उदयनराजे भोसले यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, असा प्रश्नही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना विचारला. या प्रश्नावरही उदयनराजेंनी नेहमीच्या शैलीत उत्तर दिले. चार भिंतीत अडकून राहायला मी कारकून आहे का, असे सूचक विधान त्यांनी केले. 


तत्पूर्वी नीरा देवघर पाण्यावरून पेटलेल्या वादातही उदयनराजे भोसले यांनी देखील उडी घेत पक्षाला घरचा आहेर दिला होतो. विधानपरिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्याचे सर्वेसर्वा रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता उदयनराजेंनी त्याच्यावर टीका केली. दुष्काळी भागाला पाणी देण्याचा १४ वर्षांत अध्यादेश का काढला नाही, असा सवाल केला. जिल्ह्याचे पालकमंत्री होते, कृष्णाखोऱ्याचे मंत्री होते आणि स्वतःला भगीरथ म्हणवून घेणाऱ्यांनी फक्त लाल बत्तीचा वापर स्वतः साठी केला आणि लोकांची खिल्ली उडवण्यापलीकडे काही केले नाही, असा सणसणीत टोला उद्यनराजे यांनी रामराजे निंबाळकरांना लगावला होता.