सातारा : राजे प्रजेला सोडून गेले म्हणून प्रजा नाराज झाल्याचा, टोला नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांना लगावला. जर गादीला मान ठेवून तीनदा मतदान झाले असेल तर मग चौथ्यांदा का नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तर उदयनराजेंचा गैरसमज जनतेने दूर केल्याचा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्यातल्या बहुप्रतिष्ठीत ठरलेल्या निवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाला. दिल्लीचे स्वप्न पाहणाऱ्या उदयनराजेंनी आता घरी बसावे, अशी चर्चा रंगू लागली. मात्र हा हार मानेल तो राजा कसला. पराभवानंतरचंही राजेंचे राजेपण. उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला खरा. मात्र त्यांची यंदाची खासदारकी अवघ्या चार महिन्यांची ठरली. 


पक्षांतर आणि पवारांवर केलेली टीका यामुळे साताऱ्यात काय होते, हे पाहाण्यासाठी सातारकरांसोबत साऱेच उत्सुक होते आणि झालंही तसेच. पहिल्यापासूनच पिछाडीवर असलेल्या उदयनराजेंना श्रीनिवास पाटलांकडून पराभव पत्करावा लागला. मात्र हरतील ते राजे कुठले. आपला पराभव विसरत सकाळीच राजेंनी भेट घेतली शिवेंद्रराजेंची आणि यावेळचा त्यांचा मूड कॅप्चर केला आमच्या कॅमेरामनने काहीसा असा.


उदयनराजे दाखवत नसले तरीही आपला झालेला पराभव राजेंच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. उदयनराजे म्हणालेत, आयुष्यात खूप मनापासून प्रेम केलं काम केलं. लोकं कशी मतदान करतात, काय बोलणार. पाटीलसाहेबांना शुभेच्छा. मी काम केलं त्यापेक्षा जास्त करावं, ऑल द बेस्ट.


यावेळी राष्ट्रवादींच्या मताधिक्याबाबत, शरद पवारांच्या साताऱ्यातल्या पावसातल्या सभेबाबत विचारताच ते काय म्हटले ऐका, पावसात जर असले परिणाम होत असतील तर पावसातच केले असतं ना. रिस्पेक्ट कुठे जात नाही आणि त्यांनाही माहित आहे, उदयनराजे कधी खोटं बोलंत नाही. 


आता यापुढची वाटचाल कशी असेल हे सांगायलाही उदयनराजे विसरले नाहीत. उदयनराजे दिल्लीत. दिल्ली, आणखी कुठं जाणार, काय गल्लीत राहणार का? "आज हरलो आहोत, पण थांबलो नाही... जिंकलो नाही, पण संपलोही नाही" अशा शब्दात पराभवानंतर फेसबुकवर पोस्ट टाकणारे उदयनराजे आता खरंच त्यांच्या स्टाईलने काही करून दाखवणार की त्यांची स्टाईलच फक्त शिल्लक राहणार हेच आता सातारकरांना पाहायचे आहे.