शुभेच्छा वाढदिवसाच्या, चर्चा लोकसभेची! साताऱ्यातून उदयनराजे पुन्हा लोकसभेच्या आखाड्यात?
Sharad Pawar Birthday : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने अनेकांनी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीतून बंडखोरी करुन बाहेर पडलेल्या अजित पवारांनीही शरद पवारांना शुभेच्छा दिल्यात. मात्र त्यात लक्षवेधी ठरल्यात त्या उदयनराजे भोसलेंच्या शुभेच्छा..
Sharad Pawar Birthday : माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरदचंद्रजी पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... आपणास उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना... राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) बाहेर पडून भाजपात (BJP) गेलेले राज्यसभा खासदार उदयनराजे भोसलेंनी (Udayanraje Bhosle) शरद पवारांना दिलेल्या या शुभेच्छा. उदयनराजेंच्या या शुभेच्छांमुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय. उदयनराजे साताऱ्यातून पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपात आलेले राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या फेसबुक पोस्टची सध्या जोरादार चर्चा रंगतेय. साताऱ्यातील (Satara) सध्याच्या राजकीय परिस्थितीत उदयनराजेंच्या या शुभेच्छा लक्षवेधी ठरतायत..
उदयनराजे यांची राजकीय कारकिर्द
2009 आणि 2014 साली उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि खासदार झाले. 2019 विधानसभा निवडणुकीत उदयनराजे निवडून आले. पण अवघ्या सहा महिन्यात त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवली. पण त्यांना पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभा खासदार केलं. पुढे भाजप आणि उदयनराजे यांच्यात फारसं आलबेल असल्याचं चित्र पाहिला मिळालं नाही. भाजपाच्या अनेक राजकीय कार्यक्रमांना उदयनराजे गैरहजर होते.
अजित पवार यांनी सांगितला दावा
अजित पवार गटाने लोकसभेच्या चार जागा लढवण्याचा सूतोवाच केला होता. यात सातारा लोकसभा मतदार संघावरही त्यांनी दावा सांगितला आहे. पण भाजपनेही साताऱ्याच्या जागेवर दावा केला आहे. पण अजित पवारांनी दावा सांगितल्याने भाजप ही जागा सोडणार अशी चर्चा रंगलीय. असं झालं तर अजित पवार पुन्हा उदयनराजेंना संधी देणार का याबाबत अनिश्चतता आहे.
शरद पवार काय भूमिका घेणार?
सातारा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटही आपला उमेदवार देणार हे निश्चित आहे. उदयनराजे भोसले यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेणार का? याप्रश्नावर शरद पवार यांनी तुमच्याकडे काही माहिती आहे का असं उत्तर दिलं होतं. उदयनराजे यांचं भाजपमध्ये मन लागत नाही याप्रश्नावरही शरद पवार यांनी हसतहसत कुठे मन लागतं याची खासगीत माहिती द्या असं उत्तर दिलं.