Uddhav Thackeray Comment On BJP MLA Prasad Lad: नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागामधून आमदार नागपूरात दाखल झाले आहेत. अनेक आमदार हे शहरातील मोठ्या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासहीत मुंबईतील इतरही आमदारांचा समावेश आहे. मंगळवारी शहरातील रेडिसन ब्लू हॉटेलबाहेर उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि भाजप नेते प्रसाद लाड एकाच वेळी आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी एक रंजक गोष्ट घडली. उद्धव ठाकरेंनी प्रसाद लाड यांच्याकडे बोट करुन संजय राऊत यांना, "याला सोडायचं नाही," असं म्हणाले. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


प्रसाद लाड अन् राऊत एकाच गाडीत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, रेडिसन ब्लू हॉटेलमधून बाहेर पडताना सर्वच आमदारांच्या गाड्या त्यांना हॉटेलबाहेर पडताच पिकअप करतात. उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि भाजप नेते प्रसाद लाड एकाच वेळी बाहेर पडले. सर्वात आधी प्रसाद लाड हॉटेलबाहेर आले आणि कारचालकाला चल निघू म्हणत समोर बोलावलं. तितक्यात हॉटेलमधून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे बाहेर आले. राऊत आणि उद्धव ठाकरे एकाच गाडीमधून जाणार होते. समोर आलेली गाडी रिकामी दिसल्याने संजय राऊत बसले. त्यानंतर त्याच गाडीमध्ये प्रसाद लाड बसू लागले. हे दृष्य पाहताच मागून येणारे उद्धव ठाकरे क्षणभर गोंधळले.


"याला सोडायचं नाही"


संजय राऊत आणि प्रसाद लाड एकाच गाडीमधून जाणार की काय असं चित्र दिसू लागल्याने उद्धव ठाकरेंनी, 'संजय... दोघे एकाच गाडीत जाताय... हा बघ...' असं म्हटलं. त्याचवेळी प्रसाद लाड हे संजय राऊत बसलेल्या गाडीमध्ये बसू लागले. हे पाहून उद्धव ठाकरेंनी कारमध्ये अगदी वाकून पाहत संजय राऊतांना प्रसाद लाड यांच्याकडे बोट दाखवत, "याला सोडायचं नाही," असं हसत म्हटलं. त्यावर संजय राऊतही जोरात हसले. प्रसाद लाड यांच्या चेहऱ्यावरही हे वाक्य ऐकून हसू फुललं. त्यानंतर संजय राऊतांना आपण चुकीच्या गाडीत बसल्याची जाणीव झाली. लगेच संजय राऊत गाडीमधून उतरले आणि योग्य गाडीमध्ये बसले.


दोघांमध्ये शाब्दिक वाद


संजय राऊत आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये अनेकदा शाब्दिक चकमक उडत असते. प्रसाद लाड यांनी अगदी संजय राऊत यांच्यावर त्यांच्या भाषेवरुन आणि विधानांवर टीका केली आहे. या दोन्ही नेत्यांना एकमेकांच्या नावाचा उल्लेख करत अनेकदा पत्रकारांकडून प्रश्न विचारले जातात. त्यावेळेस हे दोघेही विरोधकावर तुटून पडतात. मात्र मंगळवारी हा हलकापुलका प्रसंग हॉटेलबाहेर पाहायला मिळाला.