Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 40 आमदार आणि 12 खासदारांसह शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडत उद्धव ठाकरे यांना काही महिन्यांपूर्वी धक्का दिला होता. शिंदे गटातील नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करत होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. सत्तातरानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले आहेत. दोघांकडूनही सातत्याने एकमेकांवर टीका करण्यात येत आहे. मात्र आता शिंदे गटाच्या नेत्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी हा खुलासा केला आहे. शिवतारे हे सासवडमध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. महाविकास आघाडी ही निवडणुकीआधीच झाली होती असाही खुलासा विजय शिवतारे यांनी केला आहे.


'महाविकास आघाडी अगोदरच झाली होती'


"महाविकास आघाडी नंतर नाही झाली. आतलं डीप राजकारण सांगतो तुम्हाला. 70 जागा या केवळ लढवून उद्धव ठाकरे यांनी घालवल्या. शिवसेनेचा आमदार तिथे काम करायला लागले तर भाजपचे लोक बोलायला लागले तुम्ही आमचा आमदार पाडता तर आम्ही तुमचा मंत्री पाडतो. हे निवडणूकीपूर्वी झालेल्या करारामुळे झालं. महाविकास आघाडी ही अगोदरच झाली होती," असा खुलासा विजय शिवतारे यांनी केला आहे.


आधीचे सरकार महाराष्ट्राच्या हिताचे नव्हते - विजय शिवतारे


"हे जे काही सरकार झालं होतं ते महाराष्ट्राच्या हिताचे नव्हते. पहिल्या दोन महिन्यातच सरकारने उचल खालली होती. हा उठाव करायचं बीज एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात विजय शिवतारे यांनीच घातलं होतं. साडेचार तास आम्ही एकत्र नंदनवन येथे बसलो होतो. हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चुकीचे आहे, उद्धव ठाकरे चुकत आहेत, तुम्ही त्यांना सांगा आणि दबाव टाका. हे तोडून भाजप सेनेचे सरकार आले पाहिजे," असे शिवतारे यांनी म्हटले.


...म्हणून विजय शिवतारे शिंदे गटात


राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून ठाकरे शिवसेनेमध्ये विजय शिवतारे यांचे महत्त्व कमी झाल्याचे म्हटले जात होते.  राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर शिवसेना सत्तेत आल्यामुळे शिवतारे यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र शिंदे यांच्या बंडानंतर विजय शिवतारे यांनी शिंदे गटात जाण्याची भूमिका घेतली.