Thackeray vs Shinde Over Political Dynasty: शिवसेनेतील उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटामध्ये मागील 16 महिन्यांपासून सुरु असलेल्या वादावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी पडदा टाकत 'खरी शिवसेना' एकनाथ शिंदेंची असल्याचं म्हटलं. या निकालानंतर रात्री उशीरा पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी "एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाल्याचं आजच्या निकालावरून दिसतंय," अशी प्रतिक्रिया नोंदवली. या प्रतिक्रियेवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंचा उल्लेख करत घराणेशाहीवरुन शिंदेंनाच लक्ष्य केलं. आता यापुढे जात ठाकरे गटाने भारतीय जनता पार्टीमधील अनेक कुटुंबांचा थेट उल्लेख करत शिंदे यालाही घराणेशाही म्हणणार का असा सवाल उपस्थित केला आहे.


मुख्यमंत्री शिंदे नेमकं काय म्हणाले होते?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी, "लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं. बहुमत आमच्याकडे आहे. विधानसभेचंही आणि लोकसभेचंही. निवडणूक आयोगाने खरी शिवसेना आम्ही असल्याचं मान्य केलंय. एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाल्याचं आजच्या निकालावरून दिसतंय," असं म्हटलं होतं. तसेच "कोणीही आपल्याला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही. लोकशाहीत एखाद्या पक्षाचा प्रमुख मनमानी करत असेल तर पक्षातील इतर सहकाऱ्यांना त्याच्याविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे. अशावेळी दहाव्या परिशिष्टातील तरतुदी लागू होत नाहीत. त्यामुळे पक्षप्रमुख किंवा पक्षाध्यक्ष यांचं एकट्याचं मत संपूर्ण पक्षाचं मत असू शकत नाही. कोणताही राजकीय पक्ष एकट्या माणसाची खासगी मालमत्ता होऊ शकत नाही असा निर्णय अध्यक्षांनी दिला आहे," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकालानंतर म्हटलं होतं.


अनेक घराण्यांची भाजपातील नाती-गोती तपासावी लागतील


ठाकरे गटाने घराणेशाहीवरुन टीका करणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंना आजच्या 'सामना'मधील लेखात लक्ष्य केलं आहे. "राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, ‘‘हा घराणेशाहीचा पराभव आहे.’’ हे सांगताना त्यांनी स्वतःच्या घराणेशाहीकडे बोट दाखवायला हवे. अचानक खासदार झालेला श्रीकांत शिंदे हा आपला मुलगा नाही हे त्यांनी जाहीर करावे व मगच घराणेशाहीवर टिचक्या माराव्यात. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उमेदवारीवर दोन वेळा खासदार झाले," अशी आठवण ठाकरे गटाने मुख्यमंत्री शिंदेंना करुन दिली आहे. 


मुंडे, राणे, फडणवीस सारेच्यांचा उल्लेख


ठाकरे गटाने अगदी देवेंद्र फडणवीसांपासून नारायण राणेंपर्यंत अनेक कुटुंबांचा उल्लेख करत घराणेशाहीवरुन निशाणा साधला. "गंगाधर फडणवीस यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही तरी खास नाते असावे असे सांगतात. जय शहा हे महान क्रिकेटपटू अमित शहांचे कोणी तरी लागतात. कोणी म्हणतात रमाकांत आचरेकर, डॉन ब्रॅडमन, गॅरी सोबर्स वगैरेंनी क्रिकेटचे धडे चिरंजीव जय शहांकडूनच घेतले आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या उद्धाराची जबाबदारी त्यांच्यावर पडली. पीयूष गोयल व वेदप्रकाश गोयल यांचेही काही तरी संबंध असल्याचा संशय आहे. नारोबा तातू राणे व नित्या नारू राणेही एकाच घरात राहतात. महाराष्ट्रात विखेपाटील, मुंडे परिवार, लातुरात निलंगेकर अशा अनेक घराण्यांची भाजपातील नाती-गोती तपासावी लागतील," अशी खोचक टीका ठाकरे गटाने केली आहे.


उद्या आंबेडकरांच्या घराणेशाहीवरही शिंदे आपली जीभ टाळ्यास लावतील


"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, वारसा प्रकाश आंबेडकर पुढे नेत आहेत. उद्या आंबेडकरांच्या घराणेशाहीवरही शिंदे आपली जीभ टाळ्यास लावतील. ज्यांच्या घराण्यात विचार आहे, तोच विचारांची घराणेशाही पुढे नेतो. शिंद्यांसारख्यांची घराणी ही दलाली व खोकेबाजीचा वारसा पुढे नेतात. महाराष्ट्राचा विचार व संस्कृतीचा वारसा महान आहे. त्या विचारांशीही संबंध नसलेले लोक महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत. छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारे उदयन राजे भाजपच्या घरात आहेत. शिंदे त्यासही घराणेशाहीच म्हणणार काय?" असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.


खोकेबाजांची घराणी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुलामगिरीचे पट्टे गळ्यात बांधून बेताल बडबडतात अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे. "मुख्यमंत्री व त्यांचा मिंधे गट आज उन्मादाच्या नशेत आहे. ते घराणेशाहीवर बोलतात, पण गुलामगिरीचे पट्टे गळ्यात बांधून बेताल बडबडतात. त्यांचा उन्माद फार टिकणार नाही. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणजे ‘ट्रायब्युनल’ने दिलेला निर्णय अंतिम नाही. त्याच्यावर सर्वोच्च न्यायालय व जनतेचे न्यायालय आहे. निकाल तेथेच लागेल व खोकेबाजांची घराणी कायमची नष्ट होतील! ती वेळ दूर नाही. महाराष्ट्र रामशास्त्र्यांचा आहे. छ‘दाम’शास्त्र्यांचा नाही," असं लेखाच्या शेवटी म्हटलेलं आहे.