मुंबई : महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना उद्धव ठाकरे मात्र परदेशात आहेत. परदेशातील थंड हवेचा आस्वाद घेत, ते महाराष्ट्रातील संपकरी शेतकऱ्याना पाठिंबा देताहेत हे विशेष.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या शिवसेनेला कर्जमाफीच्या कृती आराखडयाचं उद्धव ठाकरे यांच्यापुढे सादरीकरण हवं आहे. याकरिता सरकारवर दबाव टाकण्यासाठी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीलाच शिवसेनेच्या मंत्र्यांनी दांडी मारली. आता याला मुख्यमंत्री तयार झालेच आणि GST प्रमाणे कृती आराखड्याचंही मातोश्रीमध्ये जाऊन सादरीकरण करायचं ठरलंच, तरी ते करणार कसं, असा प्रश्न त्यांना पडू शकतो, कारण उद्धव ठाकरे तर सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी परदेशात आहेत.


परदेशातून त्यांचं महाराष्ट्रातल्या शेतकरी आंदोलनावर अत्यंत बारीक लक्ष आहे म्हणे. शिवाय शेतकऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी ते अधून मधून पाठिंब्याचं लेखी निवेदनही काढताहेत. एकीकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत सहभाग आणि त्याच वेळी शेतकरी आंदोलनालाही पाठिंबा देत आहे. शिवसेनेच्या या कन्फ्यूज्ड भूमिकेमुळे बळीराजाही कन्फ्युजनमध्ये आहे.


सैनिक रस्त्यावर आणि पक्षप्रमुख परदेशात हे नेहमीचंच आहे, नंतर श्रेय घ्यायला उद्धव ठाकरे येतील, अशा शब्दांत नारायण राणेंनी तोफ डागली आहे. आंदोलनाच्या निर्णायक क्षणी उद्धव ठाकरे गायब असतात हा अनुभव आहे. काही वर्षांपूर्वी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आंदोलक पोलीसांच्या लाठ्या खात असताना उद्धव ठाकरे मध्यप्रदेशातल्या कान्हा अभयारण्यात फोटोग्राफीमध्ये मश्गूल होते... आताही तसंच झालंय...


शेतकऱ्यांचं आंदोलन निर्णायक टप्प्यावर असताना उद्धव ठाकरे पुन्हा सहकुटुंब परदेशात आहेत. शेतकऱ्यांबाबत उद्धव ठाकरेंना इतकाच  कळवळा असेल, तर ते सुटी संपवून परत का येत नाहीत ? शिवसेनेचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांची सुटी संपण्याची वाट पाहायची की ते व्हिडिओ कॉन्फरन्स वैगरे करून मार्गदर्शन करणार आहेत, असे भाभडे प्रश्न महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पडलेत.