पंढरपूर : जाहीर सभेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रभागा नदीची महाआरती केली. त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि आदित्य ठाकरेही आरतीला उपस्थित होते. शिवसेनेचे सर्व मंत्री आणि नेते चंद्रभागाच्या तीरावर जमलेले होते. अभंग गायनाच्या भक्तीमय वातावरणात मंत्र्यांनाही टाळ वाजवण्याचा मोह आवरता आला नाही. त्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत सर्व मंत्री, नेते आणि जमलेल्या शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं या महाआरतीत सहभाग घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंढरपुरातल्या जाहीरसभेपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंढरपुरात आपल्या कुटुंबियांसह सर्वात आधी विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिरात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी एकमेकांना पुष्पहार घातला. त्यानंतर विठ्ठल मंदिर समितीतर्फे मंदिरातच त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे इतर नेतेही उपस्थित होते.


युती करायची की नाही, ते जनता ठरवेल, असं सांगत उद्धव ठाकरेंनी पंढरपूरच्या भाषणात थेट स्वबळाची भाषा करणं टाळलं. त्यामुळे युतीच्या मुद्यावर गूढ आणखीनच वाढलंय. जय श्रीरामसोबतच जय किसानचा नाराही उद्धव ठाकरेंनी चंद्रभागा तीरावरच्या सभेत दिला. पंढरपुरातल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी रामंदिरासह शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घातला. कांद्याचा दराचा प्रश्न निकाली निघायलाच हवा असं सांगत पुन्हा कर्जमुक्तीचा मुद्या उचलून धरलाय. तर राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीसाठीच घेतल्याचं सांगत भाजपला थेट आव्हान दिलं. पाच राज्यांमध्ये भाजपाचा धुव्वा उडाल्यामुळे अहंकार ठेचला गेल्याचा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. मात्र उद्धव ठाकरेंचं पंढरपुरातलं भाषण म्हणजे अयोध्येतल्या भाषणाची मराठी आवृत्ती ठरली.