मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणामध्ये अनेक उलथा-पालथ सुरु आहेत. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना (Shivsena) पक्षातील काही नेत्यांनी बंड करुन भारतीय जनता पक्षासोबत (BJP) राज्यात सरकार स्थापन केलं आहे. 'शिवसेना' पक्षावर आणि 'धनुष्यबाण' या चिन्हावर शिवसेनेच्या शिंदे गटाने दावा केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commision) 'शिवसेना' नाव आणि  'धनुष्यबाण' हे चिन्ह गोठवलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तूळात चर्चेला उधान आलं आहे. या प्रकरणावर सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका करण्यात आली आहे.


बंडखोरांमुळे शिवसेना पक्षाचं चिन्ह गोठवलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commision) आगामी निवडणूकांना लक्षात घेत, 'शिवसेना' नाव आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह गोठवल्याने अग्रलेखामधून टीका केली आहे. केंद्रात अस्तित्वात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मदतीने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला खिंडार पाडण्यात आलं आणि शिवसेना पक्षातील काही बंडखोरांमुळे शिवसेना पक्षाचं चिन्ह गोठवलं गेलं. असा आरोप अग्रलेखातून करण्यात आला.


एकनाथ शिंदे हे गारद्यांचे सरदार...


'एकनाथ शिंदे हे गारद्यांचे सरदार आहेत, त्यांचा दुष्टपणा हा तैमूरलंग, चंगेझखान, औरंगजेब यांच्याप्रमाणेच आहे.' अशी टीका देखील सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. त्यासोबतच, 'कोणी कितीही कट कारस्थानं केली तरी शिवसेना संपणार नाही' असं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.


गारद्यांनी आईशीच बेइमानी केली...


"कोणी कितीही कट-कारस्थाने केली, बेइमानीचे घाव घातले तरी शिवसेना संपणार नाही. ती पुन्हा जन्म घेईल, झेपावेल, उसळेल, दुष्मनांच्या नरडीचा घोट घेईल. निवडणूक आयोगाने आता शिवसेनेचे ‘धनुष्यबाण' हे चिन्ह गोठवले आणि 'शिवसेना' हे नाव स्वतंत्रपणे वापरण्यास मनाई करणारा अंतरिम आदेश काढला. दिल्लीने हे पाप केले. बेइमान गारद्यांनी आईशीच बेइमानी केली! आम्ही शेवटी इतकेच सांगतो, कितीही संकटे येऊ द्या, त्यांच्या छाताडावर पाय देऊन आम्ही उभे राहूच!", असा ठाम विश्वास अग्रलेखातून दाखवला आहे.


बेइमानांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्याकुट्ट शाईने लिहिले जाईल


बाळासाहेब ठाकरे यांनी छपन्न वर्षांपूर्वी मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी एक वन्ही चेतवला, हिंदुत्वाच्या समिधा टाकून त्याचा वणवा केला. आज त्या शिवसेनेचे अस्तित्व संपविण्यासाठी याच महाराष्ट्राच्या मातीतील एकनाथ शिंदे व त्याचे चाळीस भामटे दिल्लीचे गुलाम झाले. त्यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत गारद्यांची भूमिका बजावली. शिंदे आणि त्यांच्या चाळीस बेइमानांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्याकुट्ट शाईने लिहिले जाईल, अशी टीकेची झोड अग्रलेखातून केली.


शिवसेना फोडण्याचा आम्ही अडीच वर्षांपासून प्रयत्न...


निवडणूक आयोग या स्वायत्त संस्थेने निष्पक्षपणे काम कारयाला हवं पण तसं होताना दिसत नाहीये. केंद्रीय स्वायत्त संस्थेच्या कारभारात केंद्र सरकारकडून दबाव आणला जातोय. असा आरोप देखील अग्रलेखातून करण्यात आला. त्यासोबतच, 'शिवसेना फोडण्याचा आम्ही अडीच वर्षांपासून प्रयत्न करीत होतो, एकनाथ शिंदे यांच्यामुळे अखेर यश मिळालं, असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले असल्याचा दाखला देत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून भारतीय जनता पक्षावर (BJP) देखील सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका करण्यात आली.