Uddhav Thackeray-Prakash Ambedkar Alliance: राज्याच्या राजकारणात नवं समीकरण जुळलं असून ठाकरे गट (Thackeray Faction) आणि वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) युती केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav  Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा केली. आंबेडकर भवनात ही पत्रकार परिषद पार पडली. राजकारणातील वाईटाविरोधात आम्ही एकत्र आल्याचं यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसंच घटनेचं पावित्र्य राखण्यासाठी आम्ही एकत्र येत असल्याचंही ते म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटनेचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. पुढची वाटचाल एकत्र करण्यासाठी आम्ही आलो आहोत. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. जे काही देशात चाललं आहे, ते देशातल्या तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहचलं पाहिजे असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 


दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी यानिमित्ताने निवडणुकीत बदलाचे राजकारण सुरू होईल अशी आशा व्यक्त केली आहे. उपेक्षितांचे राजकारण व्हावे यासाठी प्रयत्न केले. जिंकून येणं हे मतदारांच्या हातात आहे. उमेदवारी देणे पक्षाच्या हातात आहे, त्याचे सार्वत्रिकीकरण होईल असंही त्यांनी सांगितलं.


"राजकारणात नव्या गोष्टी मांडण्याची गरज आहे. दावोसला फक्त करारनामे होतात," अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली. "शरद पवार व माझे जुने भांडण आहे. आमचं काही शेतावरचं भांडण नाही, तर विचारांचं आहे. आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा बाळगतो," असंही ते म्हणाले.


ईडीच्या मार्फत राजकीय नेतृत्व संपवण्याचं काम सुरू आहे असा आरोप करताना त्यांनी नरेंद्र मोदींच्या भाजपाचाही अंत होणार आहे, त्यांनी त्यांच्या पक्षातील नेतृत्व संपवलं आहे अशी टीका केली. राष्ट्र हे सर्वात महत्वाचं असून राजकारण नितीमत्तेवर येईल याचा प्रयत्न राहील असं स्पष्ट करताना सध्या आम्ही दोघंच एकत्र आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. 



"या युतीचा विजय होईल. जागावाटपावर चर्चा तर झाली आहे. कुणाच्या वाटेला कुठल्या जागा हे ठरवू. सामंजस्याचे राजकारण करायचे नसेल तर मग एकत्र येण्याचा काय फायदा," अशी विचारणा करताना हिंमत असेल तर निवडणूक घ्या असं आव्हान त्यांनी दिलं. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीय आहे असंही ते म्हणाले. 


"आम्हाला गृहीत धरून राजकारण चालले होते. आम्ही त्यांच्याकडे बघत असताना आमचेच फुटले. दुस-याचे घर फोडून स्वत:चे घर सजवणा-यांची औलाद निर्माण झाली आहे," अशी टीका त्यांनी केली. 


आम्ही एकत्र का आलो? वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीचे संयुक्त निवेदन 


देशाची राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधोगतीकडे जाताना दिसत आहे. लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी करत देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. हुकूमशाहीकडे सुरू झालेली वाटचाल थांबवण्यासाठी राजकीय पाऊल उचलण्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत आहे. जनसामान्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांना बाजूला सारून अवास्तव विषयांना प्राधान्य दिले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील शेवटच्या भाषणात (25 नोव्हेंबर 1949 रोजी) देशाला उद्देशून इशारा दिला होता की, देशामध्ये सामान्यांचे प्रश्न सोडून इतर विषयांत महत्त्व दिले तर देशाच्या स्वातंत्र्याला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही नेहमीच देश आणि लोकहिताला प्राधान्य दिले. लोकशाहीस प्राधान्य दिले नाही तर देशात अराजक निर्माण होईल ही त्यांची भूमिका डॉ. आंबेडकरांच्या परखड विचारांशीच मिळणारी आहे. महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म ही आवश्यक बाब असल्याचे नमूद केले आहे, परंतु या तिघांनीही राष्ट्राला प्राधान्य दिलेले आहे. लोकशाही टिकली तरच देश टिकतो, असे मत प्रबोधनकार ठाकरे यांनीसुद्धा मांडले आहे. म्हणून आम्ही एकत्र येऊन देशाचे स्थैर्य, नीतिमत्ता व राष्ट्रीय हिताचे राजकारण करण्यास कटिबद्ध आहोत! असं संयुक्त निवेदनात सांगण्यात आलं आहे. 


नारायण राणेंची टीका


"दोघांचीही मोदींवर टीका करण्याची लायकी नाही. आपण कुठे आहोत आपल्या मागे किती लोक आहेत, आपल्यासोबत किती आमदार आणि खासदार आहेत हे प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी पहावे. ५६ आमदार होते आणि आता १२ राहिले नाहीत, त्यांनी टीका करू नये. आम्ही टीका करायला लागलो, तर त्यांना पळती भुई कमी पडेल. हे प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे लक्षात ठेवावं," असा इशाराच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. 


"शिवसेना आहे कुठे?  भीमशक्ती देशात आहे, पण प्रकाश आंबेडकर आणि भीमशक्तीचा संबंध काय? किती दलित लोकांचे संसार बसवले हे प्रकाश आंबेडकर यांनी सांगावं," असं आवाहनच नारायण राणे यांनी दिलं.