`मुख्यमंत्र्यांनी वळून ठेवलेल्या फासाच्या दोरावरच खोटारड्या सरकारला...`; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल
CM Eknath Shinde On Badlapur School Case: `बदलापूर प्रकरणात सरकार ज्या निर्लज्जपणे वागले त्याचा हा इरसाल नमुना आहे. खोटे बोलणे, फसवाफसवी करणे हे मिंधे सरकारच्या रक्तातच आहे.`
CM Eknath Shinde On Badlapur School Case: बदलापूर प्रकरणानंतर एका जाहीर भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अवघ्या दोन महिन्यांमध्ये आरोपीला फाशी दिल्याचं विधान केल्याच्या मुद्द्यावरुन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. खोटे बोलून राज्य आणले व खोटे बोलून राज्य चालवीत आहेत, असं म्हणत ठाकरेंच्या पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सदर प्रकरणाबद्दल तपशील जाहीर करावा अशी मागणी केली आहे.
फेक नरेटिव्हचा डाव भाजपावर उलटला
"बदलापूर प्रकरण हे महाराष्ट्राच्या प्रतिमेला आणि प्रतिष्ठेला काळे फासणारे आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपयांत गुंडाळण्याच्या प्रयत्नावर त्यामुळे पाणी पडले. मुख्यमंत्री मिंधे, गृहमंत्री फडणवीस म्हणतात, “बदलापूर प्रकरणात विरोधक राजकारण करीत आहेत. विरोधक फेक नरेटिव्ह तयार करतात.’’ देशात फेक नरेटिव्ह करून निवडणुका लढवण्याची सुरुवात भारतीय जनता पक्षाने केली. हा डाव आता त्यांच्यावरच उलटला आहे," असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे.
इतके मोठे प्रकरण इतक्या गुप्तपणे हाताळून...
"आता गद्दारांचे लाडके मुख्यमंत्री श्रीमान मिंधे हे किती ‘फेक’ व खोटे बोलतात त्याचे एक उदाहरण समोर आले आहे. बदलापूर प्रकरणानंतर मिंध्यांनी महिलांसमोरील एका भाषणात ‘थाप’ मारली की, “आम्हाला महिलांच्या सुरक्षेची काळजी आहे. अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात अशीच एक दुर्दैवी घटना घडली. एका मुलीवर अत्याचार झाला, पण आम्ही गप्प बसलो नाही. बलात्काराचा खटला आम्ही एकदम फास्ट ट्रकवर चालवला व दोन महिन्यांपूर्वीच त्या गुन्हेगाराला फाशी दिली.’’ मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीने इतके भन्नाट खोटे बोलावे? महाराष्ट्रात बलात्काराचे असे कोणते प्रकरण घडले व ते फास्ट ट्रकवर चालवून गुन्हेगारास मिंध्यांनी फाशी दिली? इतकी मोठी घटना घडून महाराष्ट्रास त्याची कानोकान खबर नाही हे आश्चर्यच आहे. जर हा गुन्हा घडला असेल तर त्याची नोंद कोणत्या पोलीस स्टेशनात आहे? कोणत्या न्यायालयात हा खटला चालवून आरोपीला फासावर लटकवले व संबंधित आरोपीस कोणत्या कारागृहात फाशी दिली? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी लगेच करायला हवा. इतके मोठे प्रकरण इतक्या गुप्तपणे हाताळून आरोपीस फाशी देणे ‘सोपे’ काम नाही," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.
तपशील जाहीर केला तर बरे होईल
"राज्याच्या पोलिसांना तरी हे प्रकरण माहीत असायला हवे. की सरकारची पोलीस खात्यातील एकमेव लाडकी बहीण रश्मी शुक्ला यांनीच परस्पर तपास करून आरोपीला फासावर लटकवले हेसुद्धा पाहायला हवे. फाशीचा दोर वळण्यासाठी मिंधे व त्यांचे आमदार गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात गेले असावेत. कारण प्रकरण मिंधे म्हणतात त्याप्रमाणे अडीच वर्षांपूर्वीचे आहे व फाशी तर दोन महिन्यांपूर्वी दिली. इतका झटपट न्याय देऊनही महाराष्ट्राला व देशाला त्याची माहिती नसेल तर महाराष्ट्राच्या राज्यपालांनी याबाबतचा घटनात्मक तपशील जाहीर करायलाच हवा. एखाद्या अपराध्यास फाशी द्यायची असेल तर राज्यापालांची परवानगी रीतसर घ्यावीच लागते. त्यामुळे मुख्यमंत्री मिंधे यांनी फाशी दिलेल्या त्या नराधमाची नोंद राजभवनात असणारच असणार. मुख्यमंत्र्यांनी या नराधमास नक्की कोठे फासावर लटकवले? त्या जागेस शक्ती पार्क किंवा शौर्य पार्कचा दर्जा द्यायला हरकत नाही, पण मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी संबंधित घटनेचा तपशील जाहीर केला तर बरे होईल," असं खोचक विधान ठाकरेंच्या पक्षाने केलं आहे.
बदलापूर प्रकरणात सरकार ज्या निर्लज्जपणे वागले
"मुख्यमंत्र्यांनी ज्यास फासावर लटकवले तो अत्याचारी कोण? कुठला? त्यास ‘वर्षा’ बंगल्याच्या मागच्या मोकळ्या जागेत फासावर लटकवले की राजभवनाची मागील जागा त्यासाठी वापरली? याचा ऐतिहासिक दस्तऐवज कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाला तर ‘फास्ट ट्रक’ची महती भविष्यात गाता येईल. बदलापूर प्रकरणात सरकार ज्या निर्लज्जपणे वागले त्याचा हा इरसाल नमुना आहे. खोटे बोलणे, फसवाफसवी करणे हे मिंधे सरकारच्या रक्तातच आहे. जसे बलात्कारप्रकरणी अज्ञात सोम्यागोम्याला फासावर लटकवल्याची पोपटपंची झाली, तसाच प्रकार आंदोलकांना खोटे ठरवण्याचा झाला. बदलापुरात आंदोलकांची लाट उसळली होती. हे सर्व आंदोलन करणारे लोक बाहेरचे व भाडोत्री आहेत असे ‘फेक नरेटिव्ह’ सिद्ध करण्याचा प्रयत्न सरकारने केला," असा आरोप ठाकरेंच्या पक्षाने केला आहे.
सगळे आंदोलक बदलापूरचेच
"गिरीश महाजन हे मंत्री तर हा खोटेपणा करण्यात आघाडीवर होते. त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस या कामात माहीर आहेत, पण फडणवीस वगैरे लोकांनी त्यांच्याच पोलिसांनी ज्या आंदोलकांना अटक केली त्यांचे रिमांड रिपोर्ट पाहायला हवेत. हे तर सांगत होते की, आंदोलक बाहेरून आणले, पण रिमांड रिपोर्टमधील सगळे लोक हे बदलापूरचेच रहिवासी आहेत, हे तुमच्या पोलिसांनीच सिद्ध करून दाखवले. खोटे बोलल्याबद्दल गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी. मिंधे मुख्यमंत्री एका आरोपीस फाशी दिल्याची कथा सांगतात, तीदेखील खोटी. त्याचवेळी राज्याचे गृहमंत्री व त्यांचे चेले बदलापूरचे आंदोलक हे बाहेरचेच लोक असल्याचे जाहीर करतात. मात्र तेही खोटे ठरले. असे ‘येक नंबर’चे खोटे लोक महाराष्ट्राच्या बोकांडी बसले आहेत. खोटे बोलून राज्य आणले व खोटे बोलून राज्य चालवीत आहेत. बळी जात आहे तो महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचा. मुख्यमंत्र्यांनी एक फासाचा दोर वळून ठेवला आहे. त्याच फासावर खोटारड्या सरकारला लटकवावे लागेल. उद्याचा ‘महाराष्ट्र बंद’ ही त्याचीच सुरुवात आहे," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.