Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या भाषणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा सादला. मुंबईतील माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मनसेकडून महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन खास आपल्या शैलीत टोला लगावला. मात्र उद्धव यांनी केलेल्या या टीकेला लगचे दुसऱ्या दिवशी मनसेने जशास तसं उत्तर दिलं आहे.


ठाकरेंचा हल्लाबोल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे गटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांचं स्वागत करण्यात आल्यानंतरच्या उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर आणि त्यांच्या मित्रपक्षांवर तोफ डागली. उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर आणि भाजपवर तोफ डागली. मात्र यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या चुलत भावावर सूचकपणे निशाणा साधला. आपले कोण आणि परके कोण? हे लोकसभा निकालातून कळालं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मनातील खंत देखील बोलून दाखवली. मात्र लगेच पुढच्याच वाक्यात त्यांनी राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची खिल्ली उडवली.


उद्धव वर्धापनदिनाच्या भाषणात राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले?


कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी, "मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे की या निवडणुकीत आपण फक्त शिवसेनाप्रमुखांचा फोटो वापरला. इतर कोणाचाही फोटो लावला नाही. या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण हे कळालं. काही जणांनी फक्त उद्धव ठाकरे नको म्हणून 'बिनशर्ट' पाठिंबा दिला," असं म्हणत राज ठाकरेंना सूचक शब्दांमध्ये टोला लगावला. "उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट..." असं उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची खिल्ली उडवत म्हटल्यानंतर सभागृहात टाळ्या आणि शिट्ट्या वाजल्याचं पाहायला मिळालं.


नक्की वाचा >> Shivsena Foundation Day: एकदा नाही चारदा फुटलीये शिवसेना! बाळासाहेबांच्या हयातीतच 3 बंड


मनसेचं उत्तर


उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेला 12 तासांमध्ये मनसेनं उत्तर दिलं आहे. मनसेचे नेते तसेच वरळी मतदारंसघातून विधानसभेचे संभाव्य उमेदवार संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवरुन उत्तर दिलं आहे. आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. "हिरव्या मतांच्या जोरावर यश मिळवल्यामुळे काही लोक पांचट जोक मारत आहेत, पण येणाऱ्या निवडणुकीत मराठी माणूस यांची चड्डीपण शाबूत ठेवणार नाही," अशी पोस्ट संदीप देशपांडेंनी केली आहे.



राज ठाकरेंनी घेतलेल्या सभा


दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी नारायण राणेंबरोबरच पुण्यातील मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती. तसेच त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातही महायुतीसाठी प्रचारसभा घेतलेली. राज यांनी जिथे सभा घेतल्या तिथे महायुतीचा विजय झाल्याचं सांगत मनसेनं समर्थनावरुन महाविकास आघाडीला यापूर्वीच सुनावलं आहे.