बीड : शिवसेना - भाजप युतीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. यावेळी भाजपच्या सरकावर जोरदार टीका केली. युती गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचे हित पाहा, असा टोल उद्धव ठाकरे यांनी बीडच्या सभेत भाजपला हाणला आहे. दरम्यान, पीकविम्यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप जालन्याच्या सभेच उद्धव यांनी करुन भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर हल्लाबोल केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला आहे. केंद्रासह राज्य सरकारच्या योजनांची उद्धव ठाकरेंनी बीडमधील आपल्या भाषणात पोलखोल केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युती गेली खड्ड्यात आधी शेतकऱ्यांचे हित पाहा असे म्हणत त्यांनी भाजपवर चांगलंच तोंडसुख घेतले. पीक विमा योजनेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. तर राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या चारा छावण्यांसदर्भातील वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. अशा नेत्यांना कसाईवाड्यात नेऊन सोडा, अशी अप्रत्यक्ष टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. मी ‘मनकी बात’ नाही, ‘जनकी बात’ करतो. आपला कोण आणि थापाड्या कोण हे आता ओळखायला शिकले पाहिजे. युतीची चर्चा गेली खड्ड्यात पहिले माझ्या शेतकऱ्याचे काय करता ते बोला? तुमचे दिवस राहिलेत तरी किती? मी पुन्हा मराठवाड्यात येणार आहे, ही माझी शेवटची भेट नाही, असे उद्धव यावेळी म्हणालेत.


उद्धव ठाकरे यांच्या  भाषणातील ठळक मुद्दे :


- एक दुष्काळ मी हटवतो दुसरा (राजकीय) दुष्काळ तुम्ही हटवा
- दुष्काळ गंभीर पण शिवसेना खंबीर
- माणसांसाठी पाण्याच्या टाक्यांप्रमाणेच जनावरांसाठी पाण्याचे हौदही शिवसेना देणार आहे
- बीडमध्ये केंद्रीय पथक आल्यानंतर तुमच्या रेशनमध्ये कपात झाली, हे खरं आहे की खोटं ?
- जर निर्णय न्यायालय देणार असेल तर मग तुम्ही जाहिरनाम्यात राम मंदिराचे वचन का दिलेत ?
- ना तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकलात ना तुम्ही राम मंदिराचा मुद्दा सोडवू शकलात
- पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झालाय
- मी ‘मनकी बात’ नाही, ‘जनकी बात’ करतो
- सामनामध्ये येते ते सत्यच असते
- खरे बोलून एकही मत मिळाले नाही तरी चालेल पण खोटे बोलून मिळालेली मते नकोत,  असे शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते
- युतीची चर्चा गेली खड्ड्यात पहिले माझ्या शेतकऱ्याचे काय करता ते बोला
- तुमचे दिवस राहिलेत तरी किती? उद्धव ठाकरेंचा सवाल
- मी पुन्हा मराठवाड्यात येणार आहे, ही माझी शेवटची भेट नाही
- आपला कोण आणि थापाड्या कोण हे आता ओळखायला पाहिजे
- नव्या वर्षात अच्छे दिनच नाही तर अच्छे वर्षही येऊद्या अशी मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो
- नवीन वर्ष सुरू होऊन नऊ दिवस झालेत
- उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पशुखाद्याचे वाटप