`लाचार, लाळघोटेपणा करणारा फडतूस गृहमंत्री`, रोशनी शिंदे भेटीनंतर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांवर संतापले
Uddhav Thackeray Meets Roshni Shinde: ठाण्यातील युवासेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshni Shindey) यांना मारहाण करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली.
Uddhav Thackeray Meets Roshni Shinde: राज्याला एक फडतूस गृहमंत्री लाभला आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. लाचार, लाळघोटेपणा करणारा उपमुख्यमंत्री, नुसती फडणवीसी करणारा व्यक्ती गृहमंत्री म्हणून मिरवत आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ठाण्यातील युवासेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांना मारहाण करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
"गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने आपल्या सरकाबद्दल नपुंसक अशा शब्द वापरल्याचं मी ऐकलं असून त्याची प्रचिती आली आहे. सरकारच नपुंसक म्हटल्यावर कोणाकडून काय अपेक्षा करायची या प्रश्न आहे. ठाण्याची ओळख शिवसेनेचं, जीवाला जीव देणाऱ्या शिवसैनिकांचं, आनंद दिघेंचं, सुशिक्षित, सुसंस्कृत अशी आहे. पण ती ओळख पुसून गुंडांचं ठाणे अशी करायचा प्रयत्न सुरु आहे," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
"महिला गुंडगिरी करु लागल्या तर देशाचं, ठाण्याचं काय होणार हा प्रश्न आहे. त्यांनी काही करावं आणि आम्ही ऐकून घ्यावं असं नाही. आम्ही आता य़ाक्षणी ठाण्यातून यांची गुंडगिरी मुळासकट उखडून फेकून देऊ शकतो. महिला गुंडांकडून हल्ला करणारे हे नपुंसकच आहेत," असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
"अशा महिला या आपल्या संस्कृतीत बसणाऱ्या नसल्याने त्यांना गुंडच म्हणावं लागेल. व्हिडीओत सगळं रेकॉर्ड झालं आहे. गंभीर बाब म्हणजे, रोशनी दुबे मातृत्वाचे उपचार घेत असल्याने हात जोडून लांबून बोला असं सांगत होत्या. पण तरीही तिच्या पोटात लाथा मारण्यात आल्या. हे अंत्यत निर्घृण काम करणारी माणसं ही महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीची नाहीत," असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
"पोलीस आयुक्त सरकारचा घटक म्हणून वागत आहेत. फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा उपमुख्यमंत्री, नुसती फडणवीसी करणारा व्यक्ती गृहमंत्री म्हणून मिरवत आहे. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदाराने हल्ला केला तरीही ते हलायला तयार नाहीत. यांची गुंडगिरी वाढत चालली आहे," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
"मी रोशनी शिंदे यांना भेटलो. त्यांनी आपण काहीही कमेंट केली नसल्याचं सांगितलं. तसंच त्यांनी माफीचा व्हिडीओही रेकॉर्ड केला. तरीही त्यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे फडतूस गृहमंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांच्या घऱावर काही आलं की लगेच एसआयटी नेमली जाते. लगेच शेजारी राज्यात जाऊन अटका होतात. पण मिंधे गटाच्या आमदारांनी त्यांच्यावर हल्ले केले तर तिथे फडणवीसी दाखवण्याची हिंमत नाही. गुंडागर्दीचं राज्य सुरु आहे. आता यांना मुख्यमंत्री म्हणायचं की गुंडमंत्री म्हणायचं हे लोक ठरवतील. गुंडमंत्री म्हणून असं एक खातं तयार करुन तिथे गुंड पुसण्याचं काम द्यावं," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
"मी पुन्हा सांगतोय की, शिवसैनिक शांत आहेत म्हणजे तुमच्यासारखे नपुंसक नाहीत. मनात आणलं तर ठाण्यातून मुळासकट उखडून टाकतील असे शिवसैनिक आणि नागरिक आहेत. ताबडतोब गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. अन्यथा लोक तुमच्यावर थुंकतील. थोडी लाज, लज्जा शरम असेल तर बिनकामाच्या आय़ुक्तांची बदली करा किंवा निलंबित करा. ठाण्याला कणखर आयुक्त द्या. अद्याप साधा एफआयरही दाखल झालेला नाही. ज्यांच्या नावाने यात्रा काढत आहात साधे त्यांचे घेणार असाल तर यात्रा काढू नका," असंही ते म्हणाले.