मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच राष्ट्रवादी नेते यांनी अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात. थोड्याच वेळात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक वांद्रे येथील ट्रायडेंट हॉटेल येथे पार होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेवर टीका केली. भाजपा-शिवसेना युतीला जनमत मिळाले होते. पण शिवसेनेने आकड्यांचा खेळ करत भाजपाशी बोलणी करण्याऐवजी इतर दोन पक्षांशी बोलणीला सुरुवात केली. शिवसेनेने भाजपला धमकी दिली आणि जी गोष्ट ठरलीच नव्हती त्यावर अडून बसली. यानंतर सत्ता स्थापनेसाठी जेवढे आकडे पाहिजे, बहुमतासाठी जेवढे आकडे पाहिजेत तेवढे एकटे भाजपाकडे नाहीत, म्हणून  आम्ही म्हणजे मी देखील माझा राजीनामा राज्यपालांकडे सोपवणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आम्ही जागृत विरोधी पक्षाचा आवाज जरूर होवू, एक जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका निभावणार असल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.



कोळंबकर हंगामी अध्यक्ष 


विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपा नेते कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आलीय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उद्या विधानसभेच्या अधिवेशनात नव्या आमदारांचा शपथविधी पार पडेल, अशी माहिती नवे अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी दिली आहे. नुकतेच, राजभवनात कालिदास कोळंबकर यांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली.