सरकारी बैलाचा ढोल फोडावा लागेल: उद्धव ठाकरे
द्यायची असेल तर सरसकट आणि सरळसोट कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांची चेष्टा करू नका
मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर सत्ताधारी शिवसेना सरकारविरोधात पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.
भ्रष्ट व कलंकित मंत्र्यांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्री छातीचा कोट करून लढत आहेत, पण स्वतःचेच श्राद्ध घालून मोक्ष मिळवणाऱया विदर्भातील शेतकऱयांना कोण वाचवणार? असा सवाल विचारत ‘कर्जमाफीचा असा बोजवारा उडताना दिसत असेल तर सरकारी बैलाचा ढोल फोडावा लागेल’, असे शिवसेनेने म्हटले आहे. पण लगेच ‘संयमास मर्यादा आहेत!’, असे सांगत शिवसेनेने स्वत:ला सावरलेही आहे.
दै. सामनामधून लिहिलेल्या लेखात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांची फरफट याकडे लक्ष वेधले आहे. ठाकरे यांनी म्हटले आहे की, ‘शेतकरी कर्जमाफीचे नक्की काय सुरू आहे याबाबत सत्य जाणून घ्यायचे असेल तर विदर्भातील शेतकऱयांची व्यथा समजून घेतली पाहिजे. यवतमाळच्या शेतकऱयांनी जिवंत शेतकऱयांचे श्राद्ध घालायचे ठरवले आहे. जिवंत शेतकऱयांच्या अंत्ययात्रा काढून झाल्या, आता श्राद्ध घालून मोकळे व्हावे असे शेतकऱयांना वाटते. कारण कर्जमाफीची फक्त घोषणा झाली, पण शेतकऱयांच्या तोंडास पाने पुसण्याचेच उद्योग सुरू आहेत’, अशी टीका ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान,‘‘शेतकरी पुत्र देशाचा राष्ट्रपती झाला, शेतकरी पुत्र देशाचा उपराष्ट्रपती झाला, असे डांगोरे पिटून उपयोग काय? राज्यात जिवंत शेतकऱयांच्या अंत्ययात्रा निघत आहेत, श्राद्धं घातली जात आहेत. कारण कर्जमाफीची घोषणा करूनही शेतकऱयांची ओंजळ रिकामीच आहे. अनेक जाचक अटी, नियमांच्या झाडाझडतीतून कर्जमाफीचा दरवाजा उघडणे कठीण झाले आहे. कर्जमाफी द्यायची असेल तर सरसकट आणि सरळसोट कर्जमाफी द्या, त्यांची चेष्टा करू नका’, असे ठाकरे यांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे.