पालघरच्या जाहीर सभेत युतीबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले...
आता खासदार झाल्याशिवाय गप्प बसायचं नाही असे त्यांनी श्रीनिवास वनगा यांना सांगितले.
पालघर : पालघर निवडणुकीत शिवसैनिकांनी भाजपाला घाम फोडला, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघरमध्ये केले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी पालघरमध्ये घेतलेल्या सभेत भाजपावर टीका केली. पालघरमध्ये पराभव नाहीच, आपण जिंकलेलेच आहोत. शिवसैनिकांना मानाचा मुजरा करण्यासाठी आलोय, असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्रीनिवास वनगा म्हणाले...
आता खासदार झाल्याशिवाय गप्प बसायचं नाही, असे त्यांनी श्रीनिवास वनगा यांना सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणुक आयोगावर कडाडून टीका केली. पैसे वाटणाऱ्यांवर गुन्हा दाखल का केला नाही ? असा प्रश्न त्यांनी यावेळी केला. पालघर निवडणुक संघटक म्हणून श्रीनिवास यांची यावेळी निवड करण्यात आली.
पुढचा खासदार सेनेचाच
निवडणूक जिंकलेल्या आहात, आता दिलेलं आश्वासन पूर्ण करा कारण यापुढचा खासदार हा शिवसेनेचाच असेल असा टोलाही त्यांनी भाजपावर केला. पालघर पोटनिवडणुकीचा निकाल भाजपाच्या बाजूने लागला होता, आणि शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा पराभव झाला होता, हा पराभव अजूनही उद्धव ठाकरे विसरलेले नाहीत, हे त्यांच्या भाषणातून दिसून येत आहे. या जागेवर आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचाच खासदार निवडून आणू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष
पालघरच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. यानंतर युती तुटेल की काय असं वाटत होतं, पण याआधीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि भेटीनंतर आज दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या मनात पालघरच्या पराभवाची सल कायम असल्याचं दिसून आलं.