सातारा : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याची गेल्या महिन्याभरापासून चर्चा सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून पुढची वाटचाल ठरवण्यासाठी उदयनराजे भोसले आज पुण्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीत जरी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय होणार नसला, तरी याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधीही उदयनराजेंनी त्यांच्या समर्थकांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत उदयनराजेंनी म्हटले होते की, जे काही होईल ते लोकांच्या हिताचे होईल. माझ्यासोबतच्या सहकाऱ्यांना मी विचार करून निर्णय घ्या, असे सांगितले होते. गेली २५-३० वर्षे हे लोक माझ्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांचा निर्णय माझ्यासाठी महत्त्वाचा असल्याचे उदयनराजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते.


कार्यकर्त्यांच्या या बैठकीत उदयनराजेंनी राष्ट्रवादीबद्दल नाराजी व्यक्त केली. 'माझ्यावर खंडणीसारखे गुन्हे दाखल झाले तेव्हा राष्ट्रवादीचे नेते काहीच बोलले नाहीत. पक्षातल्या कोणीच मला विचारलं नाही. मग राष्ट्रवादीसोबत का राहायचं?,' असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला.


'भाजपची वाटचाल जोरात असली, तरी नाण्याला दोन बाजू असतात. भाजपच्या कामगिरीमुळे लोकं त्रस्त आहेत. कंपन्या बंद पडत आहेत, कामगारांच्या नोकऱ्या जात आहेत. सत्ता भाजपकडे आहे म्हणून तिकडे जाणं योग्य नाही,' असं मत उदयनराजेंनी व्यक्त केलं होतं.


दरम्यान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट झाली तेव्हा, आपल्याला राजकारणातून अलिप्त व्हावंसं वाटतंय, अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली होती.