विनाअनुदानित शिक्षकांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
विनाअनुदानित महिला शिक्षक आक्रमक
विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन देऊन आपल्या व्यथा मांडल्या. गेल्या अनेक दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न प्रलंबित आहे. शासन दरबारी पाठपुरावा करुन देखील कोणतेच पाऊल उचललं जात नाही. त्यामुळे शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
शासनाच्या प्रचलित नियमानुसार वेतन अनुदानाचा आदेश काढावा, अनुदान घोषित झालेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेला शासन प्रचलित नियमानुसार 20 टक्के अनुदान देण्यात यावे. यासह विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिक्षकांनी दिला आहे.
गुरुवारी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त बीड शहरामध्ये पालकमंत्री आले असता, महिला शिक्षकांनी त्यांना भावनिक साद घातली. विनाअनुदानित शिक्षकांचा अंत सरकार कधीपर्यंत पाहणार असा सवाल महिला शिक्षकांनी केला आहे. महिला शिक्षकांनी धनंजय मुंडे यांना, तुम्ही आमचे पालक आहात तुम्ही आमचा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती केली आहे. महिला शिक्षकांनी पंधरा दिवसांपर्यंत निर्णय न झाल्यास, आपल्या घरासमोर तीव्र आंदोलन करण्याचा थेट इशारा मुंडेंना दिला आहे.