Seema Haider News:  सीमा हैदर (Seema Haider) प्रकरण सध्या संपूर्ण देशात चर्चेत असताना आता महाराष्ट्रपर्यंत त्याचे लोण पसरले आहेत. सीमा हैदर या पाकिस्तानी महिलेने तिच्या चार मुलांसह भारत गाठले आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे राहणाऱ्या सचिनच्या प्रेमात ती पडली. सचिनसोबत नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी ती नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली. मात्र, या लव्हस्टोरीमुळं संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तर, पाकिस्तानातूनही तीव्र विरोध होत आहे. सीमा पाकिस्तानात परतली नाही तर भारतात 26/11 प्रमाणे हल्ले होतील, असे धमकीवजा इशारा मुंबई पोलिसांना आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमला हा धमकीवजा इशारा देण्यात आला आहे. फोन करणारा व्यक्ती हा उर्दू भाषेतून बोलत होता. जर सीमा हैदर पाकिस्तानात परतली नाही तर भारताचा नाश होईल, अशी धमकी देण्यात आली आहे. तसंच, 26/11प्रमाणे दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहा, याकरता उत्तर प्रदेश सरकार जबाबदार असेल, असंही धमकी देणाऱ्या व्यक्तीने म्हटलं आहे. 12 जुलै रोजी पोलिसांना हा फोन आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी लगेचच तपास सुरु करुन कारवाईला सुरुवात केली आहे. 


दरम्यान, मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल पोलिसला आलेला हा  धमकीवजा मेसेजची पडताळणी केली जात आहे. सायबर पोलिसांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. एखाद्या अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 


सीमाच्या म्हणण्यानुसार पबजी खेळता खेळता तिची आणि सचिनची ओळख झाली. नंतर त्यांच्याच प्रेम फुलले. सचिनसोबत लग्न करण्याची स्वप्न पाहत सीमा भारतात आली. पण, येताना सोबत तिची चार मुलंही घेऊन आली. २७ वर्षांच्या सीमाला तिच्या पहिल्या पतीपासून चार मुलं आहेत. तिच्या चारही मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी सचिनने घेतली आहे. सीमा अवैधरित्या भारतात घुसल्याने यावरुन मोठा गदारोळ माजला आहे. सीमा पाकिस्तानची एजंट आहे का, असे प्रश्नही उपस्थित होत आहे. 


भारतातूनही सीमाला परत पाकिस्तानला पाठवून द्यावे, अशी मागणी होत आहे. तर, पाकिस्तानात असलेल्या सीमाचा नवरा आणि कुटुंबीयांनीही तिला व मुलांना पाठवण्याची मागणी केली आहे. सीमाचा नवरा गुलाम हैदर यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे ही मागणी केली आहे. तर, पाकिस्तानातील डाकूंनीही तिला पुन्हा पाकमध्ये पाठवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानी डाकू रानो शार यांनी सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा असं म्हटलं आहे. सीमाला पाकिस्तानात पाठवलं नाही तर मंदिरांवर हल्ले केले जातील अशी थेट धमकीच रानो शार याने दिली आहे. इतकंच नाही तर सिंधमधल्या रेहरकी दरबारावही हल्ल्याची धमकी दिली आहे.