`तुम्ही समाजाचे नियम...`, लिव्ह-इन रिलेशनशिप आणि समलैंगिक विवाहावर नितीन गडकरी स्पष्टच बोलले
नितीन गडकरी म्हणाले की, देशात समतोल लिंग गुणोत्तर राखणं महत्त्वाचं आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लिव्ह-इन रिलेशनशिप चुकीचं असून, समाजाच्या नियमांच्या विरोधात आहे असं मत मांडलं आहे. तसंच समलिंगी विवाहांमुळे सामाजिक संरचनेचा नाश होईल असंही ते म्हणाले आहेत. युट्यूबवरील पॉडकास्टमध्ये नितीन गडकरी यांनी यावर भाष्य केलं आहे.
यूट्यूबवरील पॉडकास्टमध्ये, नितीन गडकरी यांनी ब्रिटीश संसदेच्या त्यांच्या भेटीची आठवण करून दिली, जिथे त्यांना सांगण्यात आलं होतं की यूकेची सर्वात मोठी समस्या म्हणजे लोकांचा लग्नाला विरोध किंवा लिव्ह-इन रिलेशनशिपची निवड करणं. "तुम्ही लग्न केलं नाही, तर तुम्हाला मुलं कशी होणार? अशा मुलांचं भविष्य काय असेल? तुम्ही जर सामाजिक रचनेच्या विरोधात गेलात, तर त्याचा लोकांवर काय परिणाम होईल?", अशी विचारणा त्यांनी केली आहे.
समाज शेवटी स्वतःचे निकष ठरवतो. परंतु देशात समतोल लिंग गुणोत्तर राखला पाहिजे यावर नितीन गडकरी यांनी भर दिला. "जर 1500 स्त्रिया आणि 1000 पुरुष असतील तर आम्हाला पुरुषांना दोन बायका ठेवण्याची परवानगी द्यावी लागेल," अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.
नितीन गडकरी यांनी यावेळी आपल्या आदर्श भारतात घटस्फोटावर बंदी घातली पाहिजे हे अमान्य केलं. पण लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणं योग्य नाही असं सांगितलं आहे.
सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला आहे. तसंच तृतीयपंथीयांना समान हक्क मिळावेत असं सांगितलं आहे. या निकालाच्या एका वर्षानंतर नितीन गडकरी यांनी हे विधान केलं आहे. अशा गोष्टी वैध ठरवण्यासाठी कायदा बदलणे हे संसदेच्या कक्षेत आहे असे मानण्यास सर्व न्यायाधीशांचे एकमत होते.
दरम्यान, 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींनी न्यायालयाचा स्वतःचा 2013 मधील निर्णय रद्द केला आणि कलम 377 अंशतः रद्द केल. हा ब्रिटिश काळातील कायदा होता ज्यात सहमतीने समलिंगी लैंगिक संबंधांवर बंदी घातली होती.