मुंबई : कोरोना विषाणूची बाधा झालेल्या अनेक व्यक्ती खचून जातात. आता आपले काही खरे नाही, असे म्हणत निराश होतात. मात्र, अशा कोरोना बाधित रुग्णांना अनोख्या पद्धतीने दिलासा देण्यात येत आहे. तसेच त्यांचे मन रमविण्यासाठी संगीत आणि योगासनावर भर देण्यात येत आहे. दक्षिण सोलापूरमधील एका कोविड सेंटरमध्ये हा अनोखा प्रयोग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे येथील सेंटरमधील रुग्ण एकदम खूश दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाग्रस्तांना योग्य धीर दिला आणि त्यांचे समुपदेशन केले तर बरे होण्याचे प्रमाण वाढते, असे सोलापुरात दिसून येत आहे. योगासने आणि संगीत याच्यासोबत त्यांना सकस आहारही देण्यात येत आहे. त्यामुळे येथील उचपारानंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय दिसून आहे. हा अनोखा प्रयोग रुग्णांसाठी मोठा आधार ठरला आहे. त्यामुळे रुग्णांची मानसिकता बदलण्यास हातभार लागला आहे.


सकस आहार, स्वच्छता, करमणूक, योगासने आणि योग्य उपचार मिळाले तर कोरोनाबाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. याची प्रचिती दक्षिण सोलापूर तालुक्याच्या केटरिंग कॉलेजमधील कोविड केअर सेंटरमध्ये येत आहे. हा पॅटर्न सोलापूर जिल्ह्यातील अन्य कोविड केअर सेंटरमध्येही राबविणार असल्याचा मनोदय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी व्यक्त केला आहे.


हा अनोखा प्रयोग अन्य कोविड केअर सेंटरमध्येही पॅटर्न राबविणार आहोत. या उपक्रमातून चांगले यश मिळत आहे. यासाठी टीमवर्कने केलेल्या कामाचे हे फलित आहे, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी म्हटले आहे.


सोलापुरातील संभाजी तलावाच्या मागील बाजूला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाराष्ट्र इंन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी महाविद्यालय आहे. महाविद्यालय २७ मे २०२० पासून क्वारंटाईनसाठी घेण्यात आले. त्याचे रूपांतर कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आले आहे. २० जुलै २०२० पासून याठिकाणी प्राणायम, योगासने, करमणुकीसाठी भावगीते, सुगम संगीताचा वापर करण्यात येत आहे. या सेंटरमध्ये ३३८ रुग्णांची सोय होऊ शकते, मात्र सध्या १७८  साध्या पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरु आहेत. 


जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने याठिकाणी रवी कंटला आणि शिवानंद पाटील यांची योग प्रशिक्षणासाठी नियुक्ती केली आहे. याठिकाणी बांधकाम विभागातील उपअभियंता शाहीर रमेश खाडे एक दिवसाआड संगीताचा कार्यक्रम घेत आहेत. शिवाय कोविड सेंटरमध्ये एफएम बसविल्याने रुग्णांची करमणूक होत आहे. दिवसातून चारवेळा स्वच्छता केली जात आहे.


या सेंटरमधील ३१६ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १३८रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुपारी १ ते सायंकाळी ४ पर्यंत विश्रांतीसाठी संगीत बंद असते. सकाळी ७ ते ८ या वेळात योगासने, प्राणायामचा वर्ग असतो. यामुळे रूग्णांमध्ये असलेली भीती दूर होते. श्वसनक्रिया सुरळित होण्यास मदत होत आहे. बरे झालेले रुग्ण अजून राहण्याची इच्छा व्यक्त करीत असल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.


सकस आहार


कोरोनाबाधित रूग्णांना सकाळी दूध, दोन अंडी, दुपारी जेवण आणि फळे, सायंकाळी चहा आणि संध्याकाळी सकस जेवण देण्यात येत आहे. यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होत आहे. घरच्याप्रमाणे योग्य आहार मिळत असल्याने रूग्णांचे मनोधैर्य उंचावत आहे.


स्वच्छतेवर अधिक भर


कोरोनाच्या बाबतीत स्वच्छता महत्त्वाचा घटक आहे. कोविड केअर सेंटर आणि कोविड हॉस्पिटलमध्ये वेळेवर साफसफाई केली जात असल्याने इतर आजारांचा फैलाव रोखण्यास मदत होत आहे. यामुळे कोरोना रूग्ण बरे होत आहेत.


करमणूक आणि योगा


कोरोनाग्रस्त आधीच घाबरून गेलेला असतो. त्याला मानसिक आधार आणि रोग बरा होत असल्याचा विश्वास द्यायला हवा. शिवाय जोडीला संगीत, गाणी यांची साथ असेल तर रूग्णांना आजारी आहे असे वाटणार नाही. गाण्यांमध्ये गुंतून गेल्याने त्याला झोपही चांगली लागते, परिणामी रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि कोरोनाशी तो मुकाबला करु शकतो. संगीताचा योग्य परिणाम कोरोनाग्रस्त रूग्णांवर झाल्याने त्यांना व्यायाम, योगासने, प्राणायाम करायला लावली तर आणखी फायदा होणार आहे. प्राणायामने त्यांच्या श्वसनाच्या त्रासामध्ये ७० टक्के सुधारणा झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.