तापानंतर शरीरावर लाल रंगाचे पुरळ, सांधेदुखी; मुंबईत पसरलीये विचित्र तापाची साथ, डॉक्टर म्हणतात...
Mumbai News Today: हवमानाबदलाचा परिणाम शरीरावर देखील होत असतो. मुंबईत ताप, सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत.
Mumbai News: हवामानात होत असलेल्या सततच्या बदल्यामुळं मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईकर सध्या तापाच्या साथीने हैराण झाले आहेत. पण तापाचा हा प्रकार काहीसा विचित्र असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. पावसाने माघार घेतल्यानंतर लगेचच उन्हाचे चटके जाणवायला लागले. त्यामुळं आरोग्याच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत. साधारण सर्दी-तापाचे रुग्ण 4-5 दिवसांत ठणठणीत बरे होतात. मात्र, आता बरेच दिवस रुग्णांचा तापच निघत नाही. शरीराचे तापमान 99 ते 120 डिग्रीपर्यंत असून त्यात चढ-उतार होत आहे. या तापामुळं डॉक्टरही चकित झाले आहेत.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, तापाचे जे रुग्ण आत्तापर्यंत आले आहेत त्यांच्या शरीरावर पुरळ उठत आहे आणि याचा रंगही लाल किंवा गुलाबी असल्याचे निदर्शनास आले आहे. डोळे जळजळणे, डोके दुखणे आणि झोप न येणे, सांध्यांमध्ये अनेक दिवस वेदना जाणवणे, अशी लक्षणे दिसून येतात. आश्चर्याची बाब म्हणजे ही लक्षणे असूनही डेंग्यू, चिकुनगुनिया आणि मलेरिया यांसारख्या सामान्य आजारांसाठी रुग्णांची तपासणी निगेटिव्ह येत आहे.
नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तापानंतर शरीरावर उठलेले पुरळ हे डेंग्यूचे लक्षण आहे. मात्र, जेव्हा या रुग्णांनी तपासणी केली तेव्हा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आले. हा विचित्र तापाचा प्रकार जवळपास 2 महिन्यांपासून रुग्णांमध्ये दिसून येतोय.
गुलाबी पुरळ
महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयातील संचालक डॉ. नीलम एंड्राडे यांनी देखील याबाबत आपलं मत व्यक्त केले आहे. तापानंतर गुलाबी रंगाचे पुरळ संपूर्ण शरीरावर उठलेले दिसून येतेय आणि दोन दिवसांतच हे पुरळ गायब होतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पुरळ हे तापानंतर चौथ्या व पाचव्या दिवसानंतर उठते आणि गायब होते.
डॉक्टरांनी पुढे म्हटलं आहे की, पुरळ गायब झाल्यानंतर 5 व्या व सहाव्या दिवशी सांध्यांमध्ये वेदना होत असल्याचे दिसून आले आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या आजारांची शक्यता असताना आम्ही रुग्णांचे निरिक्षण करुन त्यांची चाचणी केली तेव्हा टेस्टचे रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आले. नायर रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, शरीरावर उठलेले पुरळाला खाज सुटते आणि त्यामुळं रुग्ण अस्वस्थ होतो. डॉक्टरांनी सांगितले की या, रुग्णांमध्ये कोणतीही जीवघेणी गुंतागुंत दिसून आली नाही.
फिजिशियन डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितले की, व्हायरल फिव्हर आणि इन्फ्लूएंझा वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारे जाणवू शकतात. ते म्हणाले, 'सामान्य संसर्गासाठी प्रारंभिक चाचणी नकारात्मक असल्यास पीसीआर चाचणी (आण्विक चाचणी) पुन्हा करावी असा माझा सल्ला आहे.'