मुंबईतील सोसायटीत ईदला कुर्बानीसाठी बकरे आणल्याने राडा, जय श्रीरामच्या घोषणा
Mira Road Bakri Eid: बकरी ईदच्या (Bakri Eid) निमित्ताने मिरा रोडमधील (Mira Road) एका सोसायटीत दोन बकरे आणण्यात आले होते. पण जेव्हा सोसायटीमधील लोकांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांना गोंधळ घालण्यास सुरुवात केली. याचदरम्यान, धार्मिक घोषणाही देण्यात आल्या. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता सोसायटीमधील नागरिकांनी त्यांच्याशीही वाद घातला.
Mira Road Bakri Eid: बकरी ईदच्या (Bakri Eid) निमित्ताने मिरा रोडमधील (Mira Road) एका सोसायटीत दोन बकरे आणण्यात आले होते. सोसायटीच्या लोकांना जेव्हा कुर्बानीसाठी बकरी आणण्यात आले असल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कित्येक तास हा गोंधळ सुरु होता. यादरम्यान, काही लोकांनी हनुमान चालिसाचं वाचन केलं, तर काहींनी 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता, आंदोलकांनी त्यांच्याशी वाद घातला. पण पोलिसांनी त्यांची समजूत काढत शांत केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहसीन शेख नावाच्या एका व्यक्तीने कुर्बानीसाठी दोन बकरे आणले होते. यावेळी सोसायटीतील लोकांना याची माहिती मिळाली असता ते खाली उतरले आणि आंदोलन करण्यास सुरुवात केली. विरोध करणाऱ्या लोकांनी हनुमान चालिसाचं पठण सुरु केलं, तसंच जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं.
मोठ्या संख्येत पोलीस सोसायटीमध्ये पोहोचले होते. यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांची समजूत काढत त्यांना शांत केलं. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्येही वाद झाला होता.
सोसायटीत कुर्बानी देऊ शकत नाही - पोलीस
पोलीस अधिकाऱ्यांनी सोसायटीमधील लोकांना सांगितलं की, नियमानुसार सोसायटीत कुर्बानी दिली जाऊ शकत नाही. आम्ही तसं होऊदेखील देणार नाही. जर असं करण्यात आलं तर आम्ही गुन्हा दाखल करु आणि अटकेची कारवाई करु. पण घरात बकरा आणू शकत नाही असा कोणताही नियम नाही. पण लोकांच्या भावना पाहता आम्ही येथून बकरा घेऊन जावा असंच सांगू.
सोसायटीत 250 मुस्लीम कुटुंबांचं वास्तव्य
सोसायटीत बकरा घेऊन जाणार्या मोहसिनने सांगितलं आहे की, या सोसायटीत 200 ते 250 मुस्लीम कुटुंब राहतात. प्रत्येक वर्षा आम्हाला बिल्डर बकरे ठेवण्यासाठी जागा देतो. पण यावेळी जागा नसल्याचं बिल्डरने सांगितलं. त्याने सोसायटीशी बोलण्यास सांगितलं होतं. पण सोसायटीकडे जागा मागण्यात आली असता त्यांनी बकरे ठेवण्यासाठी जागा दिली नाही.
दरम्यान आपण सोसायटीत कधीच कुर्बानी देत नाही असं मोहसीनचं म्हणणं आहे. त्याने सांगितलं आहे की, आम्ही कधीही सोसायटीत कुर्बानी देत नाही. आम्ही कत्तलखाना किंवा बकरे विकणाऱ्या ठिकाणी जाऊन त्यांची कुर्बानी देतो. मात्र सोसायटीमधील लोकांना बकरे आणण्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आंदोलन सुरु केलं होतं. पोलिसांनी सध्या हे प्रकरण मिटवलं आहे.