उरण हत्याकांड: यशश्रीच्या शरीरावर आरोपीच्या नावाचा टॅटू; शेवटच्या भेटीत `ते` फोटो डिलीट केले पण...
Uran Murder Case Tatoo On Yashashree Shinde Body: उरणमधील 20 वर्षीय यशस्री शिंदेंच्या हत्येप्रकरणी रोज नवीन माहिती समोर येत असतानाच आता आरोपी आणि मृत तरुणीच्या शेवटच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं ही माहिती उघड झाली आहे.
Uran Murder Case Tatoo On Yashashree Shinde Body: उरण येथील यशश्री शिंदे हत्या प्रकरणामध्ये रोज नवीन माहिती समोर येत असतानाच आता यशश्रीसंदर्भातील नवीन तपशील उघड झाला आहे. यशश्रीच्या अंगावर दाऊदच्या नावाचा टॅटू असल्याचं स्पष्ट झालं आहे. पनवेल पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानुसार आरोपी दाऊद शेखला वेळीच अटक न केल्याने यशश्रीवर हल्ला झाला असं एकंदरित घटनाक्रम पाहिल्यास स्पष्ट होत असतानाच आता या प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे.
25 जुलै रोजी सापडला मृतदेह
उरणमधील 20 वर्षीय यशस्री शिंदेंच्या हत्येप्रकरणी रोज नवीन माहिती समोर येत असतानाच आता आरोपी आणि मृत तरुणीच्या शेवटच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं ही माहिती उघड झाली आहे. या तरुणीवर वार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. पनवेल रेल्वे स्थानकाजवळ झुडपामध्ये तिचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेतील मृत तरुणी यशश्री 25 जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर ती तिच्या मैत्रीणीच्या घरी गेलेली असं सांगण्यात येत आहे. तिथून ती पनवेल स्थानकाच्या दिशेने निघून गेली होती. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास यशश्रीचा मोबाईल बंद झाला. याच कालावधीमध्ये तिच्यावर वार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर बरेच खुलासे समोर आले आहेत. त्यामध्ये एक खुलासा आरोपीच्या नावाचा टॅटू मुलीच्या शरीरावर होता.
काखेत दाऊदच्या नावाचा टॅटू
समोर आलेल्या माहितीनुसार, यशश्रीच्या अंगावर दाऊद शेखच्या नावाचा टॅटू आढळून आला आहे. यशश्रीने दाऊदच्या नावाचा हा टॅटू काखेत काढला होता. यशश्रीच्या काखेजवळ दाऊदच्या नावाचा टॅटू होता या वृत्ताला पोलिसांनी देखील दुजोरा दिला आहे. यशश्रीच्या अंगावर दाऊद नावाचा असल्याबरोबरच अन्य एक टॅटू असल्याचं बोललं जात आहे. मात्र टॅटू पोलिसांनी या दुसऱ्या टॅटूसंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. या टॅटूमुळे दाऊद आणि यशश्रीचे घनिष्ट संबंध असल्याचे स्पष्ट होत आहे.
नक्की वाचा >> उरण हत्याकांड: 'तो' कॉल लागला असता तर यशश्री वाचली असती? 2 गोष्टींचा पोलीस घेतायेत शोध
घरच्यांच्या तक्रारीनंतर पोस्को लावला पण भेटी सुरुच
काही वर्षापूर्वी यशश्रीच्या घरच्यांच्या तक्रारीनुसार दाऊद शेखविरुद्ध पोलिसांनी पोस्को लावल्यानंतरदेखील यशश्री आणि दाऊद एकमेकांच्या संपर्कात होते. दोघेही फोनवर एकमेकांशी बोलायचे. तीन वेळा दाऊद शेख यशश्रीला भेटायला उरणला आला होता. यशश्रीला घेऊन त्याला कर्नाटकमधील मूळ गावी जायचे होते. मात्र यशश्रीने यासाठी दाऊद शेखला नकार दिला आणि याचा राग येऊन दाऊदने तिची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे.
7 दिवसांची पोलीस कोठडी
लग्न करुन कर्नाटकला येण्यास नकार दिल्याने दाऊद शेखने यशश्री शिंदेवर धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या केल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दाऊदला बुधवारी कोर्टात हजर केले असता पनवेल न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस आता या प्रकरणामध्ये पुढील तपास करत आहेत. मात्र दोघांच्या शेवटच्या भेटीदरम्यान काय घडलं याचा तपशील तपासामध्ये समोर आला आहे.
ते फोटो डिलीट केले पण...
यशश्री लग्नाला नकार देत असल्याने दाऊदने यशश्रीची हत्या करण्याचा निर्णय घेतला होता. हत्या करण्याच्या उद्येश्यानेच दाऊद शेख धारदार हत्यार घेऊन कर्नाटकवरून उरणमध्ये आला होता. इथे आल्यावर वारंवार तो यशश्रीला, 'मला भेटण्यासाठी ये' अशी मागणी करत होता. मात्र यशश्री त्याला भेटण्यासाठी नकार देत होती. दाऊद शेखकडे यशश्रीचे काही फोटो होते. तू भेटण्यासाठी आली नाहीस तर ते फोटो फेसबुकवर टाकून अशी धमकी देत दाऊद शेखने जबरदस्तीने यशश्रीला भेटायला बोलावले होते. यशश्री त्याला भेटायला आल्यावर दाऊद शेखने सर्व फोटो डिलिट केले. यशश्री समोर सर्व फोटो डिलीट केल्यानंतर या भेटीदरम्यान देखील आरोपी दाऊद हा यशश्रीकडे लग्नाचा आणि कर्नाटकमध्ये येण्याचा तगादा लावत होता. मात्र यशश्री नकार देत असल्याने त्याने तिची धारदार हत्याराने वार करुन हत्या केली.