Uran Yashashree Shinde Murder Case: उरण येथे 25 जुलै रोजी झालेल्या यशश्री शिंदे नावाच्या तरुणीच्या हत्या प्रकरणामध्ये रोज नवे तपशील समोर येत असतानाच आता तिने हल्ला होण्यापूर्वी अनेकदा मदत मागण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. यशश्रीने शेवटच्या काही क्षणांमध्ये अनेकांना फोन कॉल केले होते अशी माहिती समोर आली आहे. हल्लेखोर दाऊद शेखकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं यशश्रीच्या लक्षात आल्यानंतर मदतीने तिने हे कॉल केले होते. यशश्रीने तिच्या हत्येच्या आधी शेवटचे जे काही कॉल केले होते त्यामध्ये एका मित्राचाही समावेश होता. हा कॉल पूर्ण होऊ शकला नाही. हा कॉल लागला असता तर कदाचित यशश्री वाचली असती असं म्हटलं जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, यशश्री आणि आरोपी दाऊद एकमेकांच्या चांगले परिचयाचे होते. दाऊद हा यशश्रीला त्याच्या लग्न करण्याची आणि लग्न करुन कर्नाटकला येण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र यशश्री त्याच्या मागणीला फारसं महत्त्व देत नव्हती. तरीही दाऊदकडे यशश्रीचे काही खासगी फोटो होते. हे फोटो आपण फेसबुकवर अपलोड करु अशी धमकी देत दाऊदने 25 तारखेला यशश्रीला भेटायला बोलावलं. या दोघांची भेट झाली. त्यावेळेस यशश्रीसमोर दाऊदने तिचे ते फोटो डिलीट केले. मात्र त्यानंतरही तो तिला लग्न करण्याची आणि कर्नाटकला येण्याची गळ घालू लागला. पण यशश्री आपल्या निर्णयावर ठाम होती. याच मुद्द्यावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि आधीपासूनच यशश्रीची हत्या करण्याच्या इराद्याने हत्यार घेऊन आलेल्या दाऊदने तिच्यावर अनेक वार करुन तिची हत्या केली.
मात्र हत्येपूर्वी आपला जीव धोक्यात असल्याचं लक्षात आल्यावर यशश्रीने काही जवळच्या व्यक्तींकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला. यशश्रीने तिच्या एका जवळच्या मित्रालाही फोन करुन मदत मागितली होती. मात्र नेटवर्क नसल्याने या दोघांमध्ये संवाद होऊ शकला नाही. यशश्रीने अनेकांना फोन केल्याची माहिती समोर येत असून पोलीस तिच्या कॉल लॉगच्या माध्यमातून अधिक तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे.
नक्की वाचा >> उरण हत्याकांड: यशश्रीच्या शरीरावर आरोपीच्या नावाचा टॅटू; शेवटच्या भेटीत 'ते' फोटो डिलीट केले पण...
दरम्यान, दुसरीकडे दाऊदने दिलेल्या कबुलीनुसार पनवेल स्थानकाबाहेर यशश्रीवर हल्ला केल्यानंतर त्याने तिचा मोबाईल आणि हत्येसाठी वापरलेलं हत्या घेऊन तिथून पळ काढला. त्यान कळंबोलीवरुन कर्नाटकला जाणारी बस पकडली आणि तो गावी निघून गेला. या प्रकरणामध्ये अद्याप पोलिसांना यशश्रीचा मोबाईल आणि हत्या करण्यासाठी वापरलेलं हत्यार सापडलेलं नाही. तसेच आरोपी दाऊद ज्या फोटोंच्या आधारे यशश्रीला ब्लॅकमेल करत होता त्या फोटोंचाही पोलीस शोध घेत आहेत. सध्या दाऊदची सात दिवसांची पोलीस कोठडी कोर्टाने दिली असून पोलिसांकडून सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत. यशश्रीचा मोबाईल आणि दाऊदने हत्येसाठी वापरलेलं हत्यार या दोन्ही गोष्टी प्रकरणामधील महत्त्वाचे पुरावे आहेत.