विशाल करोळे / औरंगाबाद : रेल्वे स्थानकावर शेतकऱ्यांसाठी आलेले युरिया खत निष्काळजीपणे भिजल्याची घटना समोर आली आहे. गेले काही दिवस औरंगाबादेत पाऊस सुरु आहे,  शनिवारी सुद्दा वादळी वाऱ्यासह जोरात पाऊस आला, यावेळी मालगाडीतून मोठ्या प्रमाणात युरियाची पोती आली होती. मात्र ती ठेवायला गोडावून शेडमध्ये जागा नव्हती, त्यामुळे मालगाडीतून फलाटावरच सगळी पोती उतरवण्यात आली आणि तशीच ठेवण्यात आली. यामुळे  शेकडो टन युरिया खत पावसात भिजल्याने वाया जाणार असल्याने याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेच्या मालधक्का शेडमध्ये जागा नसतांनाही पोती उतरवण्याचे कारण म्हणजे, जर पोती मालगाडीतच ठेवली तर गाडी उभी राहते आणि पार्किंगचे जास्तीचे पैसै लागतात. त्यामुळं निष्काळजीपणाने सगळी पोती उतरवण्यात आली. शनिवारी रात्री जोरात पाऊस आला आणि सगळी पोती भिजली. शेकडो टन आलेल्या या युरियाची बरीच पोती फलावाटवर होती ती पावसात तशीच भिजत राहिली. ती वाचवण्यासाठी प्रयत्नही करण्यात आले, काही पोती हलवली तर काहीवर ताडपत्री टाकण्यात आली मात्र हे प्रयत्न अपुरे पडले आणि बरीच पोती तशीच भीजत पडून राहिली. 


धक्कादायक म्हणजे हीच भिजलेली पोती रविवारी ट्रकमध्ये चढवण्यात आली आणि ग्रामीण भागात विक्रीसाठी सुद्दा पाठवण्यात आली.  युरिया खत भिजले की त्याचे पाणी होते, जी पोती भीजली त्यात युरियाचे प्रमाणही कमी झाले असेल, शिवाय युरिया कडकही झाला असेल असे, तज्ज्ञ सांगतात. त्यामुळं याच्या उपयोगितेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यात हा युरिया वापरला तर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार नाही. उलटपक्षी नुकसानच होणार आहे.


दरम्यान, रेल्वेने आणलेला माल भिजण्याची ही पहिली वेळ नाही, या आधी याच महिन्यात 18 तारखेला पावसात सिमेंटची पोती भिजली होती आणि त्यामुळं वाया गेली होती. अनेक दिवसांपासून मालधक्याचे शेड मोठी करण्याची मागणी होत आहे. मात्र त्याकडे रेल्वेप्रशासन लक्ष देत नाही. त्यात पाऊस आला तर असे नुकसान होते. दरम्यान रेल्वे प्रशासन मात्र य़ुरियावर तातडीनं ताडपत्री टाकली होती आणि त्यांना भिजण्यापासून वाचवल्याचा दावा करीत आहे. मात्र प्रत्यक्षात भिजल्यानंतर जे फोटो पुढं आले त्यातून सगळं सत्य समोर आलं आहे.  


भिजल्यानंतरही ती पोती तशीच पडून होती , त्यांना कुणीही हात लावला नाही, त्यानंतर ट्रक आले आणि सुकलेली आणि ओली सगळी पोती ट्रकमध्ये तशीच भरली गेली आहेत.  त्यात आता ही सगळी पोती विक्रीसाठी गेली आहेत. हाच युरिया शेतकऱ्यांना मिळेल आणि खराब झालेल्या युरियाचा फटका शेतकऱ्यांना बसणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही.