Pune News: लोहगडावरील उरुसाला परवानगी नाहीच, पोलिसांकडून कलम 144 लागू
Lohagad Fort : महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील विविध अनधिकृत बांधकाम हटवण्याची मागणी भाजपकडून सातत्याने केली जात आहे. अशातच आता प्रशासनानेही किल्ल्यांवरील अशा प्रकारच्या उत्सवांवर बंदी आणली आहे
Section 144 imposed at Lohgad Pune : प्रतागडाच्या (Pratapgarh) पायथ्याशी असलेल्या अफजखानाच्या कबरीशेजारील (afzal khan tomb) अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच हटवले. गेल्या अनेक वर्षांपासून हे बांधकाम हटवण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरु होती. अखेर गेल्या वर्षी हे बांधकाम जिल्हा प्रशासनाने जमीनदोस्त केले. त्यानंतर आता महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील (Maharashtra Fort) अनधिकृत बांधकाम हटवण्याचे मागणी जोर धरु लागली आहे. अशातच पुण्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर (Lohagad fort) होणाऱ्या उरुसाला परवानगी नाकारण्यात आली आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर आता लोहगडावर उरुस साजरा करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.
लोहगड परिसरात कलम 144 लागू
त्यामुळे यंदा लोहगडावर उरुस साजरा होणार नाही. पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ला हा ऐतिहासिक महत्त्व असलेले स्थळ आहे. हा किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून देखील घोषित करण्यात आलेला आहे. दरवर्षी लोहगड किल्ल्यावरील हाजी हजरत उमरशा वाली बाबा यांचा उरूस भरतो. मात्र यावर्षी उरुसाला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे लोहगड किल्ला परिसरात कलम 144 नुसार जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी उरुस
मावळ तालुक्यातील अनेक संघटनांनी लोहगड किल्ल्यावरील उरूस साजरा होऊ नये यासाठी उपविभागीय दंडाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांना निवेदन दिले होते. लोहगडावरील दर्गा व मजारी यांना कोणताही ऐतिहासिक पुरावा नसल्याने ही अनधिकृत बांधकामे काढावीत. तसेच हे अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी उरुसाचा वापर केला जात असल्याचे या निवेदनात म्हटले होते. त्यामुळे लोहगडावर उरुस होऊ देऊ नये. जस तसे झाल्यास मोठे आंदोलन उभारु असा इशारा बजरंग दल आणि इतर संघटनांनी दिला होता.
पुरातत्व विभागानेही परवानगी नाकारली
मात्र आता प्रशासनानेच उरुस साजरा करण्यास परवानगी नाकारली आहे. भारतीय पुरातत्व विभागाने ही लोहगडावर उरुसाला परवानगी नाकारली असल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे लोहगड किल्ला परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी 5 जानेवारी ते 8 जानेवारी या कालावधीत लोहगड आणि घेरेवाडी परिसरात कलम 144 आदेश लागू करण्यात आले आहेत.
लोहगड परिसरात 'या' गोष्टींवर बंदी
- लोहगड आणि घेरेवाडी परिसरात पाच पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होता येणार नाही.
- लोहगड परिसरात समाज भावना भडकतील अशा घोषणा करू नये. या परिसरात आंदोलन मोर्चा करु नये.
- गडाच्या परिसरात धार्मिक विधीसाठी पशुपक्ष्यांचा बळी दिला जाऊ नये.
- लोहगड व घरेवाडी हद्दीत स्थानिक प्रशासन व पोलिसांच्या परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बॅनर, फ्लेक्स लावण्यावर बंदी
- या काळात सोशल मीडियावरून जातीय द्वेष पसरवणारे मेसेज किंवा खोटी माहिती पोस्ट करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी दिले आहेत.