हे आहे शुद्ध शाकाहारी गाव, येथे कोणीच करत नाही मांसाहार
या गावात मांसाहार किंवा मद्यपान केलेच जात नाही.
मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : जिल्ह्यातील भूम तालुक्यातील जोतिबाची वाडी हे गाव बालाघाटच्या डोंगररांगा च्या कुशीत वसलेलं एक लहानसे खेडेगाव. दोन ते अडीच हजार लोकवस्ती असलेल्या या गावात डोंगर माथ्याच्या कुशीत ज्योतिबाचं जागृत देवस्थान आहे. निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य लाभलेल्या या जोतिबाचीवाडी या गावाला एक वेगळा इतिहास आहे. या गावात मांसाहार किंवा मद्यपान केलेच जात नाही. पिढ्यांपिढ्या ही परंपरा चालत आली आहे, असं येथील वयोवृद्ध सांगतात.
जोतिबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गावात ज्योतिबाची यात्रा दरवर्षी मोठ्या आनंदात आणि उत्साहात भरते. गावात जागृत देवस्थान असल्याने पूर्वीपासूनच गावात कोणीच मांसाहार करत नाही. या गावात मांसाहार आणि मद्यपान केले जात नाही त्यामुळे गावात भांडणं किंवा वादही होत नाहीत. शाळेत मुलांना पौष्टिक आहार म्हणून अंडे द्या, असं शासनाचा आदेश आहे, मात्र या गावच्या परंपरा नुसार शासनाचा आदेश पाळता आला नाही, असं येथील मुख्याध्यापक सांगतात.
शुद्ध शाकाहारी असलेल्या गावाची लोकसंख्या दोन ते अडीच हजार इतकी आहे. गावात कुठेही अंडे, कोंबड्या पाहायला ही मिळणार नाही. जर बाहेर गावावरून कोणी मटण खाऊन आला असेल. तर तो गावात प्रवेश करण्यापूर्वी अंघोळ करतो, मगच गावात येतो.
मांसाहार केल्यास जोतिबाचा कोप होतो, अशी या गावच्या लोकांची धारणा आहे. म्हणून पिढ्यांपिढ्या ही परंपरा चालूच आहे. मात्र शुद्ध शाकाहारी असलेले आणि श्री ज्योतिबा चे जागृत देवस्थान असलेले ज्योतीबाची वाडी हे गाव आणि देवस्थान दोन्ही ही अद्यापही विकासापासून वंचित आहेत.