Vaccination : राज्यात रायगड, रत्नागिरीसह `या` ठिकाणी लसीकरण थांबले
राज्यात (Maharashtra) अनेक जिल्ह्यांत कोरोना लसींचा (COVID-19 Vaccination) साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र काही काळापुरती बंद करण्याची नामुष्की आरोग्य यंत्रणेवर आली आहे.
मुंबई : राज्यात (Maharashtra) अनेक जिल्ह्यांत कोरोना लसींचा (COVID-19 Vaccination) साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र काही काळापुरती बंद करण्याची नामुष्की आरोग्य यंत्रणेवर आली आहे. लसीकरण केंद्र बंद पडण्याची संख्या काही दिवसाने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. केंद्र सरकारकडून केवळ 7.5 लाख डोस देण्यात आले आहेत. एका बाजूने भरमसाठ रुग्णवाढ, दुसऱ्या बाजूने नागरिकांची लसीची होणारी मागणी या दुहेरी संकटात सध्या राज्यातील आरोग्य यंत्रणा भरडली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरण मोहिमेवर विपरित परिणाम झाला आहे़. सुरुवातीला 104 ठिकाणी सुरु झालेली लसीकरण मोहीम सध्या फक्त 23 ठिकाणी सुरु आहे़. रत्नागिरी जिल्ह्यात काल तब्बल 140 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 12020 वर पोहोचली आहे. एकूण बरे झालेल्यांची संख्या 10575 वर पोहोचली आहे.
सध्या आरोग्य विभागाकडे कोवॅक्सिनचे 820 डोस शिल्लक होते. लस उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील अनेक लसीकरण बंद पडण्याची शक्यता आहे. शिल्लक राहिलेले डोस संपणार असल्याने शुक्रवारपासून कोविड लसीकरण थांबण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी लस अभावी केंद्र बंद करण्यात आली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली़. पहिल्या दिवसापासून लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला़. जिल्ह्यातील 104 ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली़. ग्रामीण भागातील नागरीकांना आरोग्य केंद्रामध्ये जाणे शक्य नसल्यामुळे त्यांच्यासाठी आरोग्य उपकेंद्रातही लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. आतापर्यंत 96,167 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील कोविड लसीकरणाला आजपासून अर्धविराम लागला आहे. केवळ कोव्हीशिल्डचे 100 डोस शिल्लक आहेत. त्याामुळे हे डोस संपल्यानंतर लसीकरण मोहीम थांबणार आहे. नव्याने डोस कधी मिळणार याची प्रतिक्षा आहे. जिल्ह्यात एकूण लसीकरण केंद्रे 84 असून त्यातील 59 केंद्र सुरु आहेत. तर 25 केंद्र बंद आहेत. एकूण लसीकरण 1लाख 39 हजार 109 इतके झाले आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथे लस उपलब्ध नसल्याने शहरातील सर्व लसीकरण केंद्र आज बंद राहणार आहेत. तर पिंपरी चिंचवड रेमडिसिव्हीर औषध चढ्या दराने विक्री करणाऱ्या तीन रुग्णालयांना आयुक्त राजेश पाटील यांची नोटीस बजावली आहे. बिर्ला हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल आणि डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलला ही नोटीस पाठवण्यात आले आहे. 48 तासात या बाबत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विदर्भातील अमरावती जिल्ह्यात कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहेत. जिल्ह्यातील 25 पेक्षा जास्त केंद्रावरील लसीकरण बंद आहेत. वेळेत लसीकरण न मिळाल्याने कोरोनाचे लसीकरण बंद कण्याची वेळ आली आहे. आज दिवसभरात आणखी लसीकरण केंद्र बंद पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली.